आमदार विनय कुलकर्णी यांना जामीन
प्रतिनिधी/ बेंगळूर
धारवाड जिल्हा पंचायतीचे सदस्य व भाजप नेते योगीश गौडा यांच्या हत्या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले आमदार विनय कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत प्राप्त झाल्यानंतर शनिवारी आमदार कुलकर्णी यांची बेंगळूरच्या परप्पन अग्रहार कारागृहातून मुक्तता होणार आहे.
विनय कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर धारवाडमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. विनय कुलकर्णी यांच्या समर्थकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमा होऊन समर्थनार्थ घोषणाबाजी केली.
11 जून 2016 रोजी योगीश गौडा यांची धारवाडमध्ये हत्या झाली होती. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांनी केला. नंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात आले होते. या प्रकरणात विनय कुलकर्णी यांना अटक करण्यात आली होती. नंतर उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता. या आदेशाविरुद्ध सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते.
सदर याचिकेवर सुनावणी करताना जामीन मंजूर करण्यासाठी घातलेल्या अटींचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून विनय कुलकर्णी यांचा जामीन रद्द केला होता. त्यामुळे विनय कुलकर्णी हे 13 जून 2025 पासून परप्पन अग्रहार कारागृहात आहेत. याच दरम्यान त्यांनी 8 डिसेंबर 2025 रोजी विशेष लोकप्रतिनिधी न्यायालयात जामिनासाठी दाखल केलेली याचिकाही फेटाळण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.