For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आमदार शिवशंकरप्पा यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

10:48 AM Dec 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
आमदार शिवशंकरप्पा यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Advertisement

बेंगळूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, दावणगेरे दक्षिणचे आमदार शामनूर शिवशंकरप्पा यांच्या पार्थिवावर सोमवारी वीरशैव-लिंगायत समुदायाच्या परंपरेनुसार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दावणगेरे शहरातील कल्लेश्वर राईस मिल आवारात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी विविध मठांचे मठाधीश, मंत्री, आमदार, विरोधी पक्षातील नेते उपस्थित होते. आजारामुळे आमदार शामनूर शिवशंकरप्पा (वय 94) यांच्यावर महिनाभरापासून बेंगळुरातील खासगी इस्पितळात उपचार सुरू होते. तथापि, उपचाराचा उपयोग न झाल्याने रविवारी सायंकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दोन आठवड्यांपूर्वी मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी इस्पितळाला भेट देऊन शिवशंकरप्पा यांच्या तब्येतीविषयी विचारपूस केली होती. ते 1994, 2004, 2008, 2013, 2018 आणि 2023 अशा सहा निवडणुकांत विधानसभेवर निवडून गेले होते.

Advertisement

एकवेळ खासदार म्हणूनही त्यांनी काम केले होते. सुमारे पाच दशके त्यांनी राजकारणासह शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात कार्यकर्तुत्वाचा ठसा उमटवला होता. अंत्यसंस्कारप्रसंगी रंभापुरी पीठाचे डॉ. वीरसोमेश्वर शिवाचार्य स्वामीजी, उज्जयनी पीठाचे राजदेशीकेंद्र शिवाचार्य स्वामीजी व काशी जगद्गुरु मल्लिकार्जुन शिवाचार्य स्वामीजी यांच्या उपस्थितीत शामनूर शिवशंकरप्पा यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पुत्र मंत्री एस. एस. मल्लिकार्जुन यांनी अंतिम विधी केले. तत्पुर्वी हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून शिवशंकरप्पा यांना मानवंदना देण्यात आली. एआयसीसीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, विधानसभा अध्यक्ष यु. टी. खादर, मंत्री एच. सी. महादेवप्पा, के. जे. जॉर्ज, भैरती सुरेश, एम. बी. पाटील, ईश्वर खंड्रे, के. एच. मुनियप्पा, जमीर अहमद खान, बोसराजू, सतीश जारकीहोळी, लक्ष्मी हेब्बाळकर, विधानसभेचे विरोधी पक्षनेते आर. अशोक, भाजप प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र आदी याप्रसंगी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.