आमदार सतीश सैल यांना 7 दिवसांचा अंतरिम जामीन
बेंगळूर : बेलकेरी बंदराहून बेकायदा खनिज निर्यात केल्याप्रकरणी कारवार-अंकोलाचे आमदार सतीश सैल यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली होती. गुरुवारी बेंगळूरमधील लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने त्यांना सशर्त जामीन मंजूर केला. आजारी असल्याने उपचाराकरिता त्यांना 7 दिवसांचा अंतरिम जामीन देण्यात आला आहे. बेकायदा खनिज निर्यात प्रकरणी ऑगस्ट महिन्यात 13 आणि 14 तारखेला आमदार सतीश सैल यांच्या निवासस्थानावर ईडीने छापा टाकला होता. यावेळी त्यांच्या निवासस्थानी घबाड आढळले होते. त्यामुळे त्यांना मंगळवार 9 सप्टेंबर रोजी बेंगळूरमधील ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याची सूचना देण्यात आली होती. मंगळवारी चौकशीनंतर त्यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली होती. त्यांना न्यायालयात हजर केले असता ईडीच्या ताब्यात देण्यात आले होते. परंतु, आजारी झाल्याने उपचारासाठी गुरुवारी वकिलांनी सतीश सैल यांना अंतरिम जामीन मंजूर करण्याची विनंती केली होती.