पूर संरक्षक भिंतींसाठी २ कोटी ११ लाखांचा निधी; तत्कालिन पालकमंत्री आमदार सतेज पाटील यांच्या प्रयत्नातून निधी मंजूर
शहरातील पूरबाधित नागरीकांची गैरसोय टळणार; आज राजलक्ष्मीनगर येथील संरक्षक भिंत बांधकामाचे उद्घाटन; स्थानिक नागरीकांतून समाधान व्यक्त
कोल्हापूर प्रतिनिधी
सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन २०२१-२२ मधून तत्कालिन पालकमंत्री आमदार सतेज पाटील यांच्या प्रयत्नातून आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या पाठपुराव्यातून कोल्हापूर शहरातील विविध पूरबाधित ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्यासाठी सुमारे २ कोटी ११ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये रामानंदनगर येथील शाहूकालीन बंधाऱ्यानजीक पूर संरक्षक भिंत बांधण्यासाठी १ कोटी २० लाख, राजलक्ष्मीनगर येथील ओढा आणि शाम सोसायटी येथील ओढा या दोन्ही ठिकाणी ७९.४३ लाखांच्या निधीतून १५५ मीटर लांबीची संरक्षक भिंत बांधली जाणार आहे. तर साळोखे नगर येथे ११.७१ लाखांच्या निधीतून संरक्षक भिंत बांधली जाणार आहे. त्यामुळे या तिन्ही ठिकाणी पावसाळ्याच्या कालावधीत होणारी नागरीकांची गैरसोय आता टळणार आहे.
यामध्ये रामानंदनगर येथील संरक्षक भिंतीच्या कामाचे उद्घाटन झाले आहे. तर राजलक्ष्मीनगर येथे ७९.४३ लाखांच्या पूर संरक्षक भिंतीच्या बांधकामाचे सोमवारी सायंकाळी ५ वाजता आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते उद्घाटन केले जाणार आहे. येथील वीर सावरकर हॉलच्या पिछाडीस हा उद्घाटन सोहळा होणार आहे.
देवकर पाणंद येथील ओढ्यावर पावसाळ्यामध्ये पाण्याचे प्रमाण वाढते. यामुळे परिसरातील नागरी वस्तीमध्ये पुराचे पाणी शिरते. यामुळे नागरीकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होतो. काही वेळा नागरिकांना स्थलांतर करावे लागते. दरवर्षी होणारी गैरसोय टाळण्यासाठी या दोन्ही ठिकाणी पूर संरक्षक भिंतीचे बांधकाम करण्याची नागरीकांची मागणी होती. त्यानुसार या कामास जिल्हा वार्षिक योजनेतून निधीची तरतूद केली आहे. यामध्ये शाम सोसायटी येथील ओढ्यावर ४५ मीटर लांबीची पूर संरक्षक भिंत बांधणे तसेच राजलक्ष्मी नगर येथील ओढ्यावर ११० मीटर लांबीची पूरसंरक्षक भिंत बांधली जाणार आहे. काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या विकास निधीतून हे काम करण्यात येत आहे. राजलक्ष्मी नगर येथील बंधाऱ्याजवळच्या नाल्यावर १५५ मीटर लांबीची पूर संरक्षक भिंत बांधली जाणार आहे. या कामामुळे स्थानिक नागरीकांना दिलासा मिळणार आहे.