सतेज पाटीलांकडे जादुटोण्यासाठी बंगाली माणसं...पक्षाने आदेश दिल्यास लोकसभा लढवणार- धनंजय महाडिक
जादुटोणा आणि भविष्य सांगण्यासाठी सतेज पाटलांकडे बंगाली माणसे आहेत अशी खरमरीत टिका करून भाजपच्या तिकिटावर शिवसेना लढणार असेल तर शिवसेना घोषणा करेल त्याचे भविष्य काँग्रेसच्या नेत्यांनी करू नये असे प्रत्युत्तर खासदार धनंजय महाडिक यांनी केले आहे. तसेच कोल्हापूर आणि हातकणंगले सध्या शिंदे गटाकडे असल्या तरी पक्षाने आदेश दिल्यास लोकसभा लढवणार असेही त्यांनी म्हटले आहे.
पहा VIDEO >>> पक्षाने आदेश दिल्यास लोकसभा लढवणार- खासदार धनंजय महाडिक
आज कोल्हापूरात माध्यमांशी संवाद साधताना खासदार धनंजय महाडिक म्हणाले, "सद्यस्थितीला हातकणंगले आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाकडेच आहेत. त्यामुळे शिंदे गटाने बैठका घेणं हे क्रमप्राप्त आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपच्या शेकडो बैठका यापूर्वी झाल्या असून अबकी बार 400 पार हा उद्देश ठेवूनच भारतीय जनता पक्षाची तयारी सुरू आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर निर्णय झाल्यास कोल्हापूरातील एक जागा लढवण्यास आमची तयारी आहे. पक्षाने लोकसभा लढवण्याचा आदेश दिल्यास मी लढणार." असेही ते म्हणाले.
शिंदे गटाचे सात आमदार भाजपच्या तिकिटावर निवडणुक लढवणार असल्याच्या सतेज पाटील यांच्या दाव्यावर बोलताना ते म्हणाले, "आमदार सतेज पाटील यांच्याकडे बंगाली माणसे आहेत. त्यामुळे जादूटोणा, ज्योतीष सांगणे हे त्यांनाच जमते. भाजपच्या तिकिटावर शिवसेना लढणार असेल तर शिवसेना त्यासंदर्भात घोषणा करेल. काँग्रेसच्या व्यक्तींना ही घोषणा करण्याची आवश्यकता नाही, त्याची चिंता त्यांनी करू नये. यासंदर्भातील ज्योतिषशास्त्र त्यांनी सांगू नये. आमचे अंतर्गत विषय आम्ही ठरवू." असेही ते म्हणाले.
राजाराम कारखान्याचा कार्यकारी संचालकांना झालेल्या मारहाणीवर बोलताना ते म्हणाले, "कालचा दिवस हा सहकारातील काळा दिवस होता. महाराष्ट्राच्या इतिहासात आजपर्यंत असे कधी घडले नव्हते. आमदार सतेज पाटील यांनी शेतकऱ्यांना उसकवण्याचा प्रयत्न केला. कालच्या मोर्चात शेतकरी कमी आणि गुंड जास्त होते. एम.डी. चिटणीस यांना मारहाण करून आमदार सतेज पाटील यांनी गुंड प्रवृत्तीचे दर्शन दिले आहे. त्यामुळे हा एक पूर्वनियोजित गटाचा भागच आहे. त्यामुळे हल्लेखोरांवर कायदेशीर कारवाई करावी. तसेच त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी करणार आहे" असे खासदार धनंजय महाडिक यांनी म्हटले आहे.
आमदार सतेज पाटील यांनी केलेल्या आमदार निधी वाटपच्या आरोपावर बोलताना खासदार महाडिक म्हणाले, "सत्ता नसेल तर सतेज पाटील काहीही बरळतात. ते पालकमंत्री असताना विरोधकांना 10 टक्के सोडा 10 रूपयेही दिला नाही. त्यामुळे त्यांना आरोप करण्याचा अधिकार नाही."असेही ते म्हणाले.