जिल्ह्यातील भूस्खलनाचा धोका टाळण्यासाठी कोणती कार्यवाही केली? आमदार सतेज पाटील यांचा सवाल
कोल्हापूर जिल्ह्यातील भूस्खलनाचा धोका असलेल्या 88 गावांमध्ये नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने कोणती कार्यवाही केली असा सवाल आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत केला. मानवी वस्ती जवळ असणाऱ्या 13 भूस्खलन ठिकाणांवर पहिल्या टप्प्यात भूस्खलन सौम्यीकरण कामासाठी 83.15 कोटीचा प्रस्ताव कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने सादर केला असून त्या प्रस्तावावर कार्यवाही करण्यात येत असल्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी लेखी उत्तरात स्पष्ट केले.
आमदार सतेज पाटील यांनी तारांकित प्रश्नाद्वारे भूस्खलग्रस्त गावातील ग्रामस्थांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला. राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने केलेल्या सर्व्हेनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील 88 गावांना भूस्खलनाचा धोका असल्याचे निदर्शनास आले आहे. या गावातील नागरिकांची जीवितहानी टाळण्यासाठी तसेच त्यांच्या स्थलांतरणासाठी कोणती कार्यवाही केली असे सवाल आमदार पाटील यांनी उपस्थित केले.
यावर दिलेल्या लेखी उत्तरात मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले, याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी अहवाल सादर केला आहे. क्षेत्र कर्मचाऱ्यांमार्फत या गावांना प्रत्यक्ष भेट देऊन भूस्खलनाबाबतची माहिती संकलित केली आहे. यातील 13 ठिकाणे मानवी वस्तीपासून जवळ असल्याचे दिसून आले आहेत. या सर्व ठिकाणी पावसाळ्यापूर्वी भूस्खलनाबाबत जनजागृती करण्यात आली आहे. त्याचबरोबर भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाला याबाबत पुन्हा एकदा सर्वे करून तांत्रिक अहवाल देण्याची विनंती केली आहे. अतिवृष्टीचा इशारा प्राप्त होताच या कुटुंबांना सुरक्षित निवारा केंद्रामध्ये स्थलांतरित करण्याचे नियोजन आहे. मानवी वस्ती जवळ असणाऱ्या 13 भूस्खलन ठिकाणांच्या पहिल्या टप्प्यात भूस्खलन सोम्यीकरण कामासाठी 83.15 कोटीचा प्रस्ताव कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने सादर केला असून त्या प्रस्तावावर कार्यवाही करण्यात येत असल्याचे पाटील यांनी लेखी उत्तरात नमूद केले.