For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

२ लाखापर्यंत नुकसान भरपाई मिळण्याची दक्षता सरकारला घ्यावी लागेल

04:56 PM May 29, 2026 IST | अनुजा कुडतरकर
२ लाखापर्यंत नुकसान भरपाई मिळण्याची दक्षता सरकारला घ्यावी लागेल
Advertisement

आमदार सदाभाऊ खोत यांचे मालवणात आंबा बागायतदारांबद्दल परखड मत

Advertisement

मालवण : प्रतिनिधी

कोकणची ओळख दाखविणारा हापूस आंबा हा वातावरणातील बदलामुळे यंदाच्या हंगामात अडचणीत आला. हापूस आंब्याचा मोहोर घळून गेल्याने आंबा बागायतदार व उत्पादकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असताना शासनाने आंबा बागायतदारांना दिलेली हेक्टरी २२ हजार रुपये व नगाला २२० रुपये अशी नुकसान भरपाई ही चुकीची असून आंबा बागायतदारांना २ लाखा पर्यंत नुकसान भरपाई मिळेल व त्याचा लाभ सर्व आंबा बागायतदारांना मिळेल याची दक्षता सरकारला घ्यावी लागेल, असे परखड मत राज्याचे माजी कृषी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे संस्थापक, आमदार सदाभाऊ खोत यांनी मालवण येथे बोलताना केले.

Advertisement

राज्याचे माजी कृषी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे संस्थापक, आमदार सदाभाऊ खोत हे मालवण भेटीवर आले असता त्यांनी मालवणमधील मातृत्व आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष लुडबे यांच्या वायरी येथील निवासस्थानी सपत्नीक सदिच्छा भेट दिली. यावेळी संतोष लुडबे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी आम. खोत यांनी यांनी स्थानिक आंबा बागायतदार व आंबा व्यवसायिकांशी घटलेल्या आंबा उत्पादनाविषयी संवाद साधत आंबा बागायतदारांच्या प्रश्नाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपण चर्चा करू, असे आश्वासन दिले.यानंतर मालवण शासकीय विश्रामगृह येथे आम. सदाभाऊ खोत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मातृत्व आधार फाउंडेशनचे दादा वेंगुर्लेकर, जगदीश तोडणकर, श्री. आपा गावकर, दिक्षा गावकर, माजी नगरसेवक यतीन खोत आदी व इतर उपस्थित होते.

पत्रकारांशी संवाद साधताना आमदार सदाभाऊ खोत म्हणाले, आंब्याच्या एका झाडावर मागे किती उत्पन्न मिळते त्याच्या किमान ५० टक्के नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, मात्र शासनाने हेक्टरी २२ हजार रुपये व नगाला २२० रुपये अशी नुकसान भरपाई दिली हे चुकीचे आहे. शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी आंबा बागायतदारांच्या प्रश्नासाठी जेव्हा मोर्चा काढला तेव्हा त्यांची धरपकड केली गेली, त्याबाबतही मी सरकारला फटकारले होते. आंबा शेतकरी हे चालत आले होते ते कोणतेही हत्यार घेऊन आले नव्हते. सरकार हे मायबाप आहे, मग लेकरांनी मायबापाकडे नाही जायचे तर कुठे जायचे याचा मार्ग सरकारने दाखवावा, असे सांगून ते म्हणाले, लोक तुमच्या पदामुळे तुमच्याकडे न्याय मागण्यासाठी येत असतात, पद नसेल तेव्हा तुमचे कोणी नावही घेणार नाही, असे यावेळी सदाभाऊ खोत यांनी सांगत सरकारला कानपिचक्या दिल्या. तसेच आंबा बागायतदारांच्या नुकसानप्रकरणी सरकारने प्रथम आंबा बागायतदार उत्पादकांशी संवाद साधला पाहिजे, त्यांची व्यथा जाणून घेतली पाहिजे व त्यातून त्यांच्या न्यायासाठी मार्ग काढावा, असे आवाहन देखील सदाभाऊ खोत यांनी केले.

पर्यटन विकासासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे - आम. खोत

यावेळी आम. सदाभाऊ खोत म्हणाले, मालवणचे पर्यटन हे केवळ मालवणी जेवण आणि तळलेला मासा यापुरतेच मर्यादित राहता कामा नये. येणारा पर्यटक हा अनेक अपेक्षांनी एखाद्या पर्यटन स्थळी येत असतो. त्यांना हवी असणारी सुरक्षितता, विविधता आणि सोयी सुविधा उपलब्ध करणे गरजेचे आहे. केरळच्या पर्यटनाची एक सिस्टीम तयार झालेली आहे, मात्र मालवण मध्ये तशी सिस्टीम दिसून येत नाही अशी खंत व्यक्त करताना सदाभाऊ खोत म्हणाले, येथील स्वच्छतेवर लक्ष दिले गेले पाहिजे, किनारपट्टीवरील घरे, हॉटेल्स सुशोभीत करून तेथे खाद्यपदार्थांचे एक मॅनेजमेन्ट तयार केले पाहिजे. किनारपट्टी हीच एक मोठी बाजारपेठ म्हणून विकसित केली पाहिजे. मालवण विशेषतः सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून ओळख जातो अशावेळी परराज्यातील पर्यटक मालवण मध्ये किती येतात यांचा अभ्यास केला गेला पाहिजे या भागात केवळ राज्यातील नव्हे तर देशी विदेशी पर्यटक कसे येतील त्यादृष्टीने शासनाने पावले उचलली पाहिजे आलेले पर्यटकांना आज वाहतूकीच्या कोंडीला सामोरे जावे लागते अशावेळी काय करता येईल पर्यायी उपाययोजना करताना बाजारपेठ कशी विकसित होईल याभागातील लोकांचा आर्थिक दृष्ट्या कसा विकास साधला जाईल याचा इथल्या लोकप्रतिनिधीनी विचार केला पाहिजे, असेही सदाभाऊ खोत म्हणाले.

जातीचे थोतांड बंद करावे - आम. खोत

आमदार सदाभाऊ खोत म्हणाले, जातीवर राजकारण करता येते, मात्र मातीवर राजकारण करता येत नाही अलीकडच्या काळात राजकारणात जाती श्रेष्ठ झाल्या व मातीची राख झाली आहे. प्रत्येक जातीचा आज एक नेता आहे. प्रत्येकाला आपली जात महत्वाची वाटत असून आपल्या जातीचा प्रश्न महत्वाचा आहे, असे वाटत आहे. आपली अमुक जात असण्यात आपले कर्तृत्व काय आहे, जात हा केवळ अपघात आहे. आज सरकार जी नोकऱ्या देण्याची पुंगी वाजवत आहे ती बंद करावी. आपण शंभर टक्के नोकऱ्या नाही देऊ शकत. जागा राखीव ठेवल्या असल्या तरी नोकऱ्या नाही देऊ शकत. त्यामुळे जातीचे थोतांड बंद करावे, असेही सदाभाऊ खोत म्हणाले.

Advertisement
Tags :

.