मध्यप्रदेशात आमदार राजेंद्र भारती दोषी
काँग्रेसला मोठा धक्का : तिहार कारागृहात रवानगी
वृत्तसंस्था/ भोपाळ
मध्यप्रदेशच्या राजकारणात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. दातिया मतदारसंघातील आमदार राजेंद्र भारती यांना भ्रष्टाचार आणि फसवणुकीच्या प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवले आहे. दिल्लीतील विशेष खासदार/आमदार न्यायालयाने सुमारे 25 वर्षे जुन्या बँक घोटाळ्याच्या प्रकरणाची सुनावणी करताना त्यांना दोषी ठरवून तिहार तुरुंगात पाठवले आहे. न्यायालय गुरुवारी शिक्षेची घोषणा करेल. न्यायालयाने त्यांना दोन वर्षांहून अधिक कालावधीचा कारावास ठोठावल्यास त्यांची आमदारकी रद्द होऊ शकते.
आमदर राजेंद्र भारती यांच्याशी संबंधित असलेले प्रकरण दातिया येथील जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण विकास बँकेशी संबंधित आहे. बँकेचे अध्यक्ष असताना राजेंद्र भारती यांनी बनावट कागदपत्रे तयार करून आणि नोंदींमध्ये फेरफार करून मुदत ठेवींमध्ये फसवणुकीचे व्यवहार केल्याचा आरोप आहे. त्यांनी 13.5 टक्के उच्च व्याजदराचा गैरफायदा घेऊन आणि एफडीची मुदत बेकायदेशीरपणे वाढवून नियमांचे उल्लंघन केल्यामुळे बँकेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. न्यायालयाने त्यांना भारतीय दंड संहितेच्या कलम 420 (फसवणूक), 467, 468, 471 (बनावटगिरी), 409 (विश्वासघात) आणि 120ब (गुन्हेगारी कट) यासह अनेक गंभीर कलमांखाली दोषी ठरवले. या प्रकरणात उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने त्यांना यापूर्वीच दिलासा देण्यास नकार दिला होता.