आमदार प्रवीण आर्लेकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
विशेष प्रतिनिधी/ पणजी
नवी दिल्लीला गेलेल्या पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर हे गोव्यात परतल्यानंतर त्यांनी मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली आणि बराच वेळ चर्चा केली. त्यानंतर दोघेही मंत्रालयातून खाली उतरले आणि पत्रकारांना पोझ दिली.
आर्लेकर यांनी ‘युटर्न’ घेतल्यामुळे डॉ. प्रमोद सावंत यांच्यावरील राजकीय संकट तूर्तास टळले आहे. प्रवीण आर्लेकर यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याची तयारी केली असती तर गोव्यात वेगळेच चित्र उभे राहिले असते, असे भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने ‘तरुण भारत’शी बोलताना स्पष्ट केले. दिल्ली दौऱ्यात ज्या ऑफर्स देण्यात आल्यात त्याची माहिती बहुदा आर्लेकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली असावी. पोझ दिल्यानंतर दोघेही जोरदार हसत मंत्रालयातून खाली उतरले. मुख्यमंत्री आपल्या कारमधून सांखळीकडे रवाना झाले तर आर्लेकर हे पेडण्याला रवाना झाले.