शक्तीपिठ महामार्गाच्या सगळया भानगडीत आमदार आबीटकर सहभागी; माजी आमदार के.पी.पाटील यांचा टोला
कोल्हापूर प्रतिनिधी
शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा होत असलेला विरोध पाहून आमदार प्रकाश आबीटकर यांनी नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले. त्या निवेदनात त्यांनी शक्तीपीठ रद्द करण्याऐवजी शक्तीपीठ मार्गिकेत बदल करा असा उल्लेख केला आहे. यावरून या महामार्गाला आबिटकरांचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट होते. महामार्गाच्या सगळ्या भानगडीत आबीटकर सहभागी आहेत असा टोला राधानगरी भुदरगड मतदार संघाचे माजी आमदार के पी पाटील यांनी लगावला.
शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीतर्फे शक्तीपीठ महामार्गा विरोधात मंगळवारी कोल्हापुरात शेतकऱ्यांचा मोर्चा झाला. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यावर झालेल्या सभेत माजी आमदार के.पी.पाटील यांनी शक्तीपीठ महामार्गावरून सत्ताधारी आघाडीचे आमदार प्रकाश आबिटकर यांच्यावर निशाणा साधला. के. पी. पाटील म्हणाले, शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांचे जीवनमान उध्वस्त करणार आहे. भुदरगड तालुक्यातील 28 गावांमधून हा मार्ग जाणार असून हजारो एकर शेती बाधित होणार आहे. सरकारने या महामार्गाची घोषणा केल्यानंतर आमदार प्रकाश आबिटकर यांनी मतदारसंघात स्वागताचे मोठे फलक लावले होते. मीच महामार्ग आणला असा फलक आबिटकरांनी लावला होता. एका प्रचार सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूरच्या प्रगतीचा दिशा आहे. आणि या मार्गासाठी आमदार आबिटकर यांनी आग्रह धरला होता असे सांगितले होते. यामुळे आता या आमदारांचे करायचं काय? नुकतेच त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. त्या निवेदनात त्यांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याऐवजी महामार्गाच्या मार्गिकेत बदल करा असे म्हटले आहे. यावरून महामार्गाला त्यांचा पाठिंबा असल्याचे दिसते. महामार्गाच्या सगळ्या भानगडीत ते आहेत असा टोला के. पी.पाटील यांनी आबिटकर यांना लगावला.शक्तीपीठ महामार्ग हा शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा आहे. आमदार व खासदाराने सभागृहात हा विषय म्हणून कामकाज चालू देऊ नका. शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय झाला पाहिजे असे माजी आमदार पाटील म्हणाले.