For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘कोल्हापूर’चा गड जिंकला, पण करवीरचा ‘सिंह’ गेला!

09:17 PM Jun 04, 2024 IST | Abhijeet Khandekar
‘कोल्हापूर’चा गड जिंकला  पण करवीरचा ‘सिंह’ गेला
MLA PN Patil Maharaj Shahu Chhatrapati
Advertisement

महाराजांच्या विजयात दिवंगत आमदार पी.एन.पाटील यांचा सिंहाचा वाटा; करवीर मतदारसंघातून श्रीमंत शाहू छत्रपतींना मोठे मताधिक्य; आमदार पी.एन.पाटील यांचे प्रयत्न सफल

कृष्णात चौगले कोल्हापूर

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकल्यानंतर करवीर विधानसभा मतदारसंघातून श्रीमंत शाहू छत्रपती यांना मताधिक्य मिळवून देणारच अशी जाहीर घोषणा दिवंगत आमदार पी.एन.पाटील यांनी केली होती. त्यानुसार त्यांनी तळमळीने प्रयत्न करून करवीरमधून शाहू छत्रपतींना मोठे बळ दिले. त्यामुळेच करवीरमधून मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून अखेरपर्यंत प्रत्येक फेरीत शाहू महाराजांना 2 हजारांहून अधिक मताधिक्य मिळाले. त्यामुळे विजयोत्सव साजरा करणाऱ्या कार्यकर्त्यांनी ‘कोल्हापूरचा गड जिंकला, पण करवीरचा सिंह गेला’ अशी भावना व्यक्त केली. मतमोजणी केंद्रापासून गल्लीबोळातील कट्टयावरचे कार्यकर्ते आणि सोशल मिडियावरील नेटकऱ्यांनाही पी.एन.पाटील यांची उणिव भासल्याचे दिसून आले.

Advertisement

दिवंगत आमदार पाटील यांनी प्रचारदौऱ्यामध्ये श्रीमंत शाहू छत्रपतींसोबत सावलीप्रमाणे राहून संपूर्ण लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला. ते करवीरचे आमदार असले तरी जिह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा आदरयुक्त दबदबा होता. त्यामुळे त्यांनी शाहू महाराजांसोबत लोकसभा मतदारसंघात अनेक दौरे करून शाहू छत्रपतींना मतदान करण्याचे आवाहन केले. त्यामुळे कागल वगळता सर्वच विधानसभा मतदारसंघातून महाराजांचे मताधिक्य सुरुवातीपासूनच वाढल्याचे दिसले.

अखेरच्या श्वासापर्यंत काँग्रेसशी एकनिष्ठ असलेल्या आमदार पी.एन.पाटील यांची करवीर विधानसभा मतदारसंघावर चांगली पकड होती. करवीर पंचायत समितीवर अनेक वर्षांपासून काँग्रेसची सत्ता आहे. भोगावती साखर कारखान्यावर आमदार पाटील यांनी निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. नुकत्याच झालेल्या भोगावती कारखान्याच्या निवडणुकीत आमदार पाटील यांनी माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांच्याशी जुळवून घेत त्यांच्याशी घरोबा केला होता. साहजिकच आमदार पाटील यांची ताकद वाढली होती. जुन्या सांगरूळ विधानसभा मतदारसंघातील कार्यक्षेत्राबरोबरच पश्चिम पन्हाळ्यासह गगनबावड्यामध्येही त्यांनी कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली होती. तसेच गगनबावडा तालुक्यात आमदार सतेज पाटील यांची ताकद असल्यामुळे करवीर विधानसभा मतदारसंघातील एकूण मताधिक्यात त्याची भर पडली.

Advertisement

उबाठा शिवसेनेचीही मोलाची साथ
करवीर मतदारसंघातील उबाठा शिवसेनेच्या ताकदीचा विचार करता सुमारे 40 हजारांहून अधिक मतांचा गठ्ठा आहे. त्यामुळे ही मते शाहू महाराजांनाच मिळाली असल्यामुळे करवीरमधील मताधिक्य अखेरच्या फेरीपर्यंत कायम राहिले.

चंद्रदीप नरकेंच्या प्रयत्नांना अपयश
माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी करवीरमधून संजय मंडलिक यांना मताधिक्य मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. पण त्यांच्या प्रयत्नांना अपयश आले. विधानसभा निवडणुकीची लिटमस टेस्ट म्हणून नरके यांनी या निवडणुकीकडे पाहिले होते. दरम्यान या मतदारसंघात जनसुराज्य शक्ती पक्षाकडून अपेक्षित पाठबळ मिळाले नसल्याचे मंडलिक गटातील कार्यकर्त्यांमध्ये चर्चा होती.

Advertisement
Tags :

.