पणजीच्या आमदाराने मौन सोडावे
उत्पल पर्रीकर यांचा टोला : पणजी शहराची दुर्दशा केल्याचा आरोप
पणजी : विकासकामांच्या नावाखाली सर्वत्र खोदून खाण परिसर करून टाकलेल्या पणजीच्या दुर्दशेवर माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रीकर यांनीही तीव्र संताप व्यक्त केला असून झोपेचे सोंग घेतलेल्या स्थानिक आमदाराने आतातरी लोकांच्या त्रासाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे. पणजीची करण्यात आलेली दुर्दशा लोकांच्या जीवावर उठली असून आतापर्यंत दोघांचे बळी घेतले आहेत. त्याशिवाय कित्येक वाहने अपघातग्रस्त होऊन त्यांच्या मालकांना नाहक भुर्दंड सहन करावा लागला आहे. तरीही स्थानिक आमदार आणि महापौरपदी असलेला त्यांचा सुपुत्र हे दोघेही मौन बाळगून आहेत, ही पणजीकरांची शोकांतिका आहे, असे संतप्त उद्गार पर्रीकर यांनी काढले.
महापौरांवर अविश्वास ठराव आणा : नगरसेवकांना आवाहन
हा प्रकार दुर्दशा आणि अपघातांपुरताच मर्यादित न राहता शहरातील प्रत्येक व्यापाऱ्याचा धंदा लयास गेला असून अनेकांवर दुकाने बंद करण्याची वेळ आली आहे. अशी भयानक परिस्थिती असतानाही जे नगरसेवक महापौरांबद्दल ब्र काढण्यास तयार नाहीत त्यांनी पणजीबद्दल थोडी तरी आस्था आणि मतदारांची कळकळ असेल तर महापौरांवर अविश्वास ठराव आणावा, असे आवाहन पर्रीकर यांनी केले आहे.
स्मार्ट सिटी व्यवस्थापकीय संचालकांना सूचनांचे निवेदन सादर
याप्रश्नी आता त्यांनी इमेजीन पणजी स्मार्ट सिटीचे व्यवस्थापकीय संचालक संजीत रॉड्रिग्ज यांना निवेदन दिले आहे. त्यात पाच मुद्द्यांवर लक्ष देण्यास सूचविले आहे. त्यात सर्वप्रथम स्मार्ट सिटी अंतर्गत होणाऱ्या प्रत्येक बांधकाम साईटचे सेफ्टी ऑडिट करावे, तसेच मूलभूत सुरक्षा मानदंड लागू करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करावी. ठिकठिकाणी खोदण्यात आलेल्या ख•dयांजवळ कोणतेही सुरक्षा उपाय केलेले नाहीत. केवळ फळ्यांच्या आधारे तात्पुरते बॅरिकेड्स तयार करण्यात आले आहेत, काही ठिकाणी तर तेही न करता चिखलाचे ढीग करून ठेवले आहेत. या ठिकाणी रात्रीच्यावेळी उजेडाची व्यवस्था करण्यात आलेली नाही किंवा रेडियम पट्ट्याही लावण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे वाहन चालकांना खोदकामांचा अंदाज न येता ते अपघातग्रस्त होत आहेत, यासारख्या त्रुटींसाठी कंत्राटदारांना दंड करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. पूर्ण झालेल्या कामांची गुणवत्ता तपासणे आवश्यक असून ती बांधकामे निर्धारित मानकांशी सुसंगत आहेत की नाही, याची खात्री करावी. सदर कामे वेळेत पूर्ण होतील याची खात्री करावी तसेच ती वेळेत पूर्ण न झाल्यास कंत्राटदारास जबाबदार धरण्यात यावे. सांडपाणी गळतीमुळे वाहतुकीचा खोळंबा किंवा आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित करावे. स्मार्ट सिटीअंतर्गत प्रत्येक कामाची सुरक्षितता आणि दर्जा निकषांचे पालन करण्यासाठी चालू असलेल्या कामांचे सतत निरीक्षण करणे. तसेच वाहतूक सुरळीत होण्यासाठी अधिकाऱ्यांना सक्रिय करणे. तसेच प्रभावित स्थानिक व्यापारी आणि रहिवाशांशी समन्वय साधणे, यासारख्या मागण्याही करण्यात आल्या आहेत.