आमदार नीलेश राणेंचा दशावतारांचे कैवारी उपाधीने गौरव
पारंपारिक दशावतार कलाकार बहुउद्देशीय संघाची बिबवणेत बैठक
कुडाळ
दशावतार कलाकारांच्या गेल्या अनेक वर्षाच्या प्रलंबित मागण्यांकडे आमदार नीलेश राणे यांनी लक्ष देऊन शासनस्तरावर आवाज उठविला आहे. अनेक वर्ष लढा देऊन नेहमी अपयशाशी झुंज देणाऱ्या दशावतार कलाकारांची यशाकडे वाटचाल करुन देणाऱ्या आमदार नीलेश राणे यांना शुक्रवारी बिबवणे येथे झालेल्या पारंपारिक दशावतार कलाकार बहुउद्देशीय संघ (सिंधुदुर्ग) च्या बैठकीत दशावतारांचे कैवारी ही उपाधी देऊन एकप्रकारे गौरव करण्यात आला.पारंपारिक दशावतार कलाकार बहुउद्देशीय संघ (सिंधुदुर्ग)च्यावतीने जिल्ह्यातील दशावतार कलाकारांची बैठक बिबवणे येथील श्री देव गिरोबा मंदिरात आयोजित करण्यात आली होती. सिंधुदुर्ग कार्यकारिणीतील सदस्य तथा प्रत्येक तालुक्यातील तालुका अध्यक्ष, प्रतिनिधी, दशावतार कलाकार असे तीस जण बैठकीला उपस्थित होते. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या आदेशानुसार दशावतार शिफारस समितीवर दशावतार कलाकार बहुउद्देशीय संघाचे दोन कलाकार सदस्य तसेच सिंधुदुर्गातील सर्व दशावतार कलाकारांची नाव नोंदणी तसेच कलाकारांच्या पोशाखासाठी मिळणाऱ्या अनुदानासाठी अ, ब, क, ड, या वर्गानुसार कलाकार नोंदणी करण्यासाठी ही नियोजन बैठक घेण्यात आली.आमदार नीलेश राणे यांनी सांस्कृतिक मंत्री श्री शेलार व सांस्कृतिक मंत्रालय पदाधिकारी यांच्याशी दशावतार कलाकार संघाची बैठक घेऊन दशावतार कलाकार नोंदणी तसेच या कलाकारांच्या अंगावरील पोशाख व अनेक समस्यांबाबत वाचा फोडली आहे. सिंधुदुर्गातील तमाम दशावतार कलाकारांना न्याय दिल्याबद्दल दशावतारांचे ते कैवारी ठरले आहेत.आमदार राणे, सांस्कृतिक मंत्री शेलार, सांस्कृतिक मंत्रालय सचिव तसेच पदाधिकारी दादा साईल, देवेन सामंत, मुंबईचे दत्तप्रसाद धुरी व सदैव दशावतार कलाकारांच्या पाठीशी असणारे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत या सर्वांना दशावतार पेटाऱ्यातील गणपती बाप्पा उदंड आयुष्य देवो,अशी प्रार्थना या बैठकीत करण्यात आली. तसेच या सर्वांबद्दल ऋण व्यक्त करण्यात आले. दशावतार कलाकारांच्या मागण्या गेली अनेक प्रलंबित आहेत.दशावतार संघटनेने पाठपुरावा करूनही या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले.मात्र,आमदार श्री राणे यांच्याकडे मागण्यांबाबत लक्ष वेधले असता,त्यांनी पुढाकार घेऊन काही दिवसातच सास्कृतिक मंत्री श्री शेलार यांच्याशी पारंपारिक दशावतार कलाकार बहुउद्देशीय संघाच्या पदाधिकाऱ्यां समवेत बैठक घेतली.यात या संघाला दशावतारी कलाकारांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय मिळाला आणि खऱ्याअर्थाने आम्हा कलाकारांना न्याय मिळाला आहे.आमदार नीलेश राणे दशावतारांचे कैवारी ही उपाधी त्यांना बैठकीत सर्वांनुमते देऊन त्याचा कार्याचा एकप्रकारे गौरव करण्यात आला.सिंधुदुर्ग दशावतार कलाकार संघांचे अध्यक्ष पुरुषोत्तम ( बाळू ) कोचरेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतार कलाकारांनी आपल्या प्रत्येक तालुका संघाच्या अध्यक्षाकडे नाव नोंदणी करून अनेक वर्ष लढत असलेल्या न्याय हक्काचा पाया मजबूत करावा, असे आवाहन केले. सर्व कलाकारांनी एकजुटीने एकत्र यावे, असे आवाहन या बैठकीत करून संघातील कार्यकारिणी सदस्य, प्रत्येक तालुका अध्यक्ष व प्रतिनिधी तसेच बिबवणेचे सेवानिवृत्त पोलीस पाटील आबा राऊळ यांचे आभार मानण्यात आले.