ठाकरे बंधूंनी एकत्र येणे ही काळाची गरज !
आमदार महेश सावंत यांची प्रतिक्रिया
सावंतवाडी । प्रतिनिधी
ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर तो आम्हाला आनंद आहे. मराठी लोकांच्या हितासाठी ठाकरे बंधूनी एकत्र येणे काळाची गरज आहे असे मत माहीमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमदार महेश सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. सावंतवाडी दौऱ्यावर आले असता ते बोलत होते . यावेळी जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, तालुकाप्रमुख मायकल डिसोजा, गुणाजी गावडे आदी उपस्थित होते . महेश सावंत म्हणाले भाजप घरात भांडणे लावण्याचे काम करत आहे. मराठी लोकांमध्ये ते फुट पाडण्याचे काम करत आहेत. अशावेळी ठाकरे बंधू मराठी लोकांच्या हितासाठी एकत्र आल्यास आम्हाला आनंद आहे. मी ज्या भागात राहतो तेथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे राहतात .हे दोघे एकत्र आल्यास आगामी निवडणुकीत सकारात्मक बदल घडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.