जयश्रीताईंना आमदार खाडेंचे निमंत्रण
मिरज
जिह्याचे माजी पालकमंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार सुरेश खाडे यांनी सोमवारी एका जाहीर कार्यक्रमात जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या श्रीमती जयश्रीताई पाटील यांना भाजपमध्ये येण्याचे निमंत्रण दिले. जयश्रीताईंना भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी (अजित पवार) मध्ये मानसन्मान आहे. पण त्यांच्याच काँग्रेसमध्ये मानसन्मान नसल्याचा आरोप खाडे यांनी केला. जयश्रीताईंनी हसतमुखाने त्यांच्या निमंत्रणाला दाद दिली.
मिरजेतील वखारभाग येथील माळी समाज स्मशानभूमीच्या कंपाऊंड भिंत बांधकामाचा शुभारंभ आमदार खाडे यांच्या हस्ते व जयश्रीताई पाटील, विधान परिषदेचे आमदार इद्रीस नायकवडी, सुरेश आवटी, माजी महापौर विजयराव धुळूबुळूसह मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. उपस्थितांनी जयश्रीताईंच्या कामाचे शासन कोणत्याही पक्षाचे असो वरिष्ठ पातळीवर त्यांना मिळत असलेल्या प्रतिसादाबद्दल कौतुक केले. हाच धागा पकडून आमदार खाडे यांनी चक्क जयश्रीताईंना भाजपात येण्याचे निमंत्रणच दिले. त्यामुळे उपस्थितांच्या भुवया निश्चितच उंचावल्या.
श्रीमती जयश्रीताई पाटील या जिह्याचे मात्तब्बर नेते असलेल्या कै. मदनभाऊ पाटील यांच्या पत्नी आहेत. राजकारणात प्रवेश केल्यापासून मदनभाऊंच्या विचारानेच त्यांची राजकीय वाटचाल सुरू आहे. त्यामुळे राज्यात शासन भाजपाचे किंवा अन्य कोणाचेही असो जयश्रीताईंना मानसन्मान दिला जातोच. पण त्यांच्याच काँग्रेसमध्ये मात्र हा सन्मान दिला जात नाही. त्यामुळे आम्ही जयश्रीताईंची प्रतिक्षा करतोय. त्या अभ्यासू आणि सुज्ञ नेत्या आहेत. आपल्या कार्यकर्त्यांचे भले कशात आहे, याची पूर्ण जाणीव त्यांना आहे. त्यामुळे त्या आमच्या निमंत्रणाचा निश्चित विचार करतील, असा दावाही आमदार खाडे यांनी केला.
श्रीमती जयश्रीताई पाटील सध्या काँग्रेसवर नाराज आहेत. सांगली विधानसभेची काँग्रेसची उमेदवारी मिळेल, या प्रतिक्षेत त्या होत्या. पण त्यांना पक्षाकडून डावलण्यात आले. त्यामुळे त्यांना बंडखोरी करावी लागली होती. तेव्हापासून त्या काँग्रेसपासून दूरच आहेत. काहीच दिवसांपूर्वी त्यांनी भविष्यातील राजकीय वाटचाल निश्चित करण्यासाठी समर्थकांची बैठक आयोजित केली होती. यामध्ये जबाबदार कार्यकर्त्यांचा कल जाणून घेतला. तो राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाकडे झुकल्याचे स्पष्ट झाले होते. यावर राजकीय खलबत्ते सुरू असतानाच आमदार खाडे यांनी जाहीर कार्यक्रमात भाजपात येण्याचे निमंत्रण दिले. त्यामुळे भविष्यात जयश्रीताई कोणती भूमिका घेणार? याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.