आमदार कागे पुन्हा संतप्त
निराश होऊन राजीनाम्याची भाषा केली : सोमवारच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण
प्रतिनिधी/ बेंगळूर
आमदारांकडे दुर्लक्ष केले जात आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांना निवेदने देऊनसुद्धा कोणताही उपयोग होत नाही. त्यामुळे कोणत्या उद्देशाने मी आमदारपदी असायला हवे? त्यामुळे निराश होऊन मी राजीनामा देण्याची भाषा केली आहे, असे स्पष्टीकरण कागवाडचे काँग्रेस आमदार राजू कागे यांनी दिले आहे.
मंगळवारी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, माझ्या मतदारसंघातील ऐनापूर नगरपंचायतमधील रस्ताकामाच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी गेलो होतो. तेथील आणखी एका रस्त्याला मंजुरी मिळून वर्ष उलटले आहे. तेथे कोणतेही काम झालेले नाही. याविषयी कंत्राटदाराला विचारले असता त्याने पैसे नाहीत, असे सांगितले होते. तेथेही अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला होता. नियमांनीसार आमदारांनी शिफारस केलेली सामुदायिक निवासस्थाने कोणत्याही अटी न लादता मंजूर करावीत. मुख्यमंत्र्यांनीही तसा आदेश दिला आहे. 1 एप्रिल 2024 रोजी ग्रामीण भागात 13 कोटी रु. खर्चुन 72 सामुदायिक निवासस्थाने बांधण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्यासाठी आतापयीत कोणतेही वर्क कार्ड दिलेले नाही. माझ्या आमदारपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर वर्क ऑर्डर दिली जाईल का?, असा परखड सवालही आमदार राजू कागे यांनी उपस्थित केला.
अधिकारी कार्यालयात बसून राहतात
बसवेश्वर पाणीपुरवठा योजनेसाठी 200 कोटी रु. आवश्यक आहेत. कंत्राटदारांना 100 कोटी रु. मंजूर करणे आवश्यक आहे. यासाठी मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना शंभरवेळा विचारले आहे. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही. अधिकारी वेतन घेत कार्यालयात बसून राहतात. मतदारसंघांत कामे करत नाहीत. प्रशासकीय व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे, अशी टिकाही त्यांनी केली.
सर्वसामान्यांची कामे त्वरित झाली पाहिजे!
प्रशासकीय व्यवस्था सुरळीत झाली पाहिजे. केवळ आमदारच नाही तर सर्व सामान्य जनतेची कामे त्वरित झाली पाहिजे. खासगी शाळांना अग्नीशमन उपकरणे बसवावीत, असे सूचविण्यात आले होते. काम होऊन एक-दोन वर्षे झाली आहेत. तरीसुद्धा त्यांना ना हरकत प्रमाणपत्रे दिली जात नाहीत. कोणतेही काम तीन ते चार दिवसांत पूर्ण होतील, असे प्रशासन असायला हवे, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिले.
मंत्री तुच्छ लेखतात
मी जिल्हा पंचायत सदस्य, अध्यक्ष, आमदार म्हणून कामे केली आहेत. 8 निवडणुका लढवून 5 जिंकल्या आहेत. माझे वडील देवेगौडा यांच्या जवळचे मित्र होते. आम्ही गावात एका भिक्षुकालाही आदर देतो. मात्र, आम्हाला मंत्री तुच्छ लेखत असल्याचा आरोपही राजू कागे यांनी केला आहे.