आमदार जयंत पाटील भाजपच्या वाटेवर ?
इस्लामपूर :
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील हे भाजपाच्या वाटेवर असल्याचे वृत्त असून 17 जानेवारी लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुण्यतिथीनंतर मोठी घडामोड घडण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत मताधिक्य घटल्यानंतर वाळवा तालुक्यातील राष्ट्रवादीमध्ये सन्नाटा आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून आ. पाटील हे राज्यस्तरीय घडामोडीत सक्रीय दिसत नाहीत. दरम्यान तालुक्यातील काही व्हॉटसअॅप ग्रुपवर जयंतराव यांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा सुऊ आहे. त्यामुळे भाजपातील स्थानिक नेत्यांतही चलबिचल सुरु आहे.
45 वर्षापासून आ. पाटील हे काँग्रेस व नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ऊळले आहेत. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नेतृत्व स्वीकारुन काम केले. त्यांना अनेक महत्वाच्या मंत्रीपदावर व पक्षीय पदावर संधी देण्यात आली. त्यांनी ही शासन व पक्षातील काम जोमाने केले. गेल्या काही वर्षापासून प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यावर त्यांनी राज्यभर पक्षाचे संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न केला. पण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गजांना पराभवाला सामोरे जावे लागले. जयंत पाटील यांचे मताधिक्य नेहमी उच्चांकी राहिले. मात्र यावेळच्या निवडणुकीत हे मताधिक्य अवघ्या 13 हजारांवर येवून ते थोडक्यात बचावले.
जिंकूनही त्यांच्यासह समर्थकांत अस्वस्थता असून राष्ट्रवादीला राज्यात मिळालेल्या अपयशानंतर काही पदाधिकाऱ्यांनी त्यांना प्रदेशाध्यक्षपदावरुन बाजूला करण्याची मागणी केली. त्यामुळे अस्वस्थतेत अधिकच भर पडली. मुंबईतील या बैठकीनंतर आ. पाटील हे गेल्या काही दिवसांपासून अज्ञातवासात राहिले. दरम्यान ते भाजपात प्रवेश करुन सत्तेत सामील होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुऊ आहे.
या चार दिवसात या चर्चेला अधिक बळ आले असून ते भाजपात येणार असल्याचे भाजपाच्या वरिष्ठ वर्तुळातून काही नेते दुजोरा देत आहेत. जयंतरावांचा भाजपा प्रवेश निश्चित झाल्यास पक्षांतर बंदी कायद्यामुळे त्यांना विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देवून पुन्हा पोट निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. ते भाजपात गेल्यास त्यांना ‘ऊर्जा’ मिळेल, तसेच त्यांच्या समर्थकांची सत्तेपासून गेल्या काही वर्षापासून दूर राहिल्याची घुसमट थांबेल. त्यांचे काही समर्थक खाजगीत आ. पाटील यांनी हा निर्णय मागेच घ्यायला पाहिजे होता. असे बोलत आहेत.
जनता पक्षातील बापू
आ. जयंत पाटील यांचे वडील लोकनेते राजारामबापू पाटील यांची ही त्यावेळी काँग्रेसमध्ये कोंडी झाली होती. दरम्यान त्यांनी आक्रमक पवित्रा घेवून जनता पक्षात प्रवेश केला होता. बापूंनी राज्यभर पदयात्रा काढून पक्ष वाढीसाठी झोकून दिले होते. सध्या जयंतराव भाजपात जाणार असल्याच्या चर्चेने बापूंच्या जनता पक्षातील प्रवेश प्रसंगाला उजाळा मिळत आहे.
स्थानिक भाजपात अस्वस्थता
आ. पाटील यांची भाजप प्रवेशाची चर्चा सुऊ झाल्यानंतर तसेच भाजपातील वरिष्ठ वर्तुळातून ही काहीसा दुजोरा मिळाल्याने स्थानिक भाजपा नेत्यांत अस्वस्थता आहे. गेल्या 40 हून अधिक काळ त्यांनी आ. पाटील यांच्याशी संघर्ष केला आहे. ते भाजपात आल्यास त्यांना त्यांच्या नेतृत्वाखाली काम करावे लागणार असल्याची सल काही नेत्यांच्या बोलण्यातून जाणवत आहे.