आमदार कार्लोस, व्हेन्झी यांनी मंत्र्याचे नाव जाहीर करावे !
वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांचे आव्हान आयआयटीचे फर्मागुडीत स्वागतच
फोंडा : रामा काणकोणकर यांच्यावर झालेल्या हल्ल्यामागे एका मंत्र्याचा हात असल्याचे आमदार कार्लोस फेरेरा व आमदार व्हेन्झी व्हिएगश यांनी केलेले विधान एक मंत्री म्हणून आपल्यालाही लागू पडते. त्यांनी असा आडपडदा ठेवण्यापेक्षा या मंत्र्याचे नाव थेट जाहीर करावे, असे आव्हान वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिले आहे. आमदार कार्लोस यांच्याकडे या हल्ल्यामागे एखादा मंत्री असल्याचा खात्रीलायक लेखी पुरावा असल्यास त्यांनी तो योग्य व्यक्तीकडे सुपूर्द करावा. उगाच मंत्र्यांची नावे घेऊन जनतेमध्ये संभ्रम निर्माण कऊ नये. राज्य मंत्रीमंडळातील बारा मंत्र्यांमध्ये आपलाही समावेश आहे. त्यामुळे त्यांना माहीत असलेल्या मंत्र्याचे नाव जाहीर करणे योग्य होईल. कुणावर अशाप्रकारे हल्ला करणे आमची संस्कृती नाही. सुसंस्कृत कुटुंबात आमची जडणघडण झाली. चांगल्या कार्यासाठी लोकांना संघटीत करणे ही शिकवण आम्हाला मिळाली आहे, असेही मंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.
आयआयटीसाठी फर्मागुडीच्या जागेचा विचार करावा
सध्या कोडार गावामध्ये आयआयटीला जो विरोध सुरु आहे. त्यावरही मंत्री सुदिन ढवळीकर यांनी भाष्य केले. गोव्यात सर्वत्र विरोध होत असल्यास फर्मागुडी येथील गोवा अभियांत्रिकीच्या जागेत आयआयटीचे स्वागतच आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आयआयटी गोव्यात आणली व फर्मागुडी येथे ट्रान्झिट कॅम्पस सुरु करण्याचा विचार आपल्याकडे मांडला. आपण त्याला पूर्ण सहमती दर्शवली. फर्मागुडीच्या साधारण 11 लाख चौ. मिटर भूक्षेत्रात गोवा अभियांत्रिकी कॅम्पस आहे. आटीआय केंद्रही तेथेच आहे. आसपासची अजून थोडी जागा ताब्यात घेतल्यास 5 लाख चौ. मीटर जागेत आयआयटीसाठी स्वतंत्र कॅम्पसची सोय होऊ शकते.
दोन मजल्यांसह व्हर्टिकल स्वऊपात उभारणी केल्यास साधारण 10 लाख चौ. मीटरपर्यंत चटई क्षेत्र मिळू शकते. आपण या पूर्वीही फर्मागुडीत आयआयटी आणण्याची सूचना केलेली आहे. कोडार गावात हा प्रकल्प उभारायचा की, नाही हे सरकार ठरवणार आहे. तूर्त गोव्यात मोक्याच्या ठिकाणी आयआयटीसाठी अपेक्षित असलेली जमीन उपलब्ध होणे कठीण आहे. त्यामुळे दुसरा पर्याय म्हणून फर्मागुडी येथील गोवा अभियांत्रिकी परिसराचा विचार होऊ शकतो. याठिकाणी चांगल्या रस्त्यांपासून सर्व प्रकारच्या सुविधा तयार आहेत. उच्च शिक्षणाच्या विविध शाखा एकाच ठिकाणी असल्याने शैक्षणिक हब म्हणून हा परिसर नावारुपाला आला असून त्यात आयआयटीची भर पडणार आहे, असे मंत्री सुदिन ढवळीकर म्हणाले.