आमदार बी. आर. पाटील यांच्याकडून ‘ध्वनिफीत’चे समर्थन
उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमारांकडून आरोपांचा इन्कार
प्रतिनिधी/ बेंगळूर
गृहनिर्माण योजनेतील घरे मिळविण्यासाठी लाच द्यावी लागत असल्याची ध्वनिफित व्हायरल झाली आहे. यावरून राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून राज्य नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष आणि आळंद मतदारसंघाचे काँग्रेस आमदार बी. आर. पाटील यांनी आपल्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. मी सत्य तेच सांगितले आहे. माझ्या वक्तव्याची चौकशी करावी, असे त्यांनी म्हटले आहे. मात्र, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी आरोप फेटाळले आहेत.
आमदार बी. आर. पाटील यांनी गृहनिर्माण मंत्री जमीर अहमद खान यांचे स्वीय सचिव सर्फराज खान यांच्याशी फोनवर केलेल्या संभाषणाची ध्वनिफित व्हायरल झाली आहे. त्यात बी. आर. पाटील यांनी आपल्या मतदारसंघातील खेड्यांमध्ये घरांचे वाटप करताना लाच द्यावी लागत असल्याबद्दल आक्षेप घेत जाब विचारला होता. या ध्वनिफितीमुळे सरकारच्या अडचणीत भर पडली आहे.
दरम्यान, शनिवारी विधानसौध येथे पत्रकारांशी बोलताना बी. आर. पाटील यांनी गृहनिर्माण योजनेतील घरांसाठी फक्त माझ्या मतदारसंघातूनच नव्हे; तर इतर मतदारसंघातील लाभार्थ्यांनाही पैसे द्यावे लागतात, असे सांगून ध्वनिफितीतील संभाषणाचे समर्थन केले आहे. जर गृहनिर्माण खात्यात असे घडले नसेल तर मंत्री जमीर अहमद खान यांची चौकशी करावी. माझ्या शिफारशी विचारात घेतल्या नाहीत. ग्राम पंचायत अध्यक्षांच्या शिफारशी विचारात घेण्यात आल्या आहेत. माझ्या व्हायरल ध्वनिफितीबद्दल मुख्यमंत्री सिद्धरामय्यांची भेट घेतलेली नाही. त्यांनी बोलावल्यास भेट घेऊन सर्वकाही स्पष्ट करेन, असेही बी. आर. पाटील यांनी म्हटले आहे.
... तर लाभार्थी लाच देणे कसे शक्य : शिवकुमार
गृहनिर्माण मंडळाच्या घरे वाटपात लाच द्यावी लागत असल्याविषयी आमदार बी. आर. पाटील यांच्या व्हायरल ध्वनिफितीविषयी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांना समजले आहे. या बाबतीत ते कारवाई करतील. बी. आर. पाटील यांनी काय म्हटले आहे, हे मला माहीत नाही. आमदारांच्या विधानामागील हेतू मला माहीत नाही. त्यांनी फोनवरील संभाषणात जे काही म्हटले आहे, ते योग्य नाही. मी त्याबद्दल निषेध व्यक्त करतो. गृहनिर्माण योजनांमध्ये पारदर्शकपणे घरांचे वाटप केले जात असताना लाभार्थी लाच देणे कसे शक्य आहे, असा प्रश्न उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी उपस्थित केला.