आमदार अतुलबाबांकडून पूरस्थितीची पाहणी
कराड :
कृष्णा आणि कोयना नदीच्या महापुराचा धोका वाढल्यानंतर आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी शहरात पूरस्थितीची पाहणी केली. याबरोबरच विश्रामगृहावर आढावा बैठक घेऊन, आपत्ती काळात जीवितहानी व नूकसान टाळण्यासाठी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या.
डॉ. भोसले यांनी शहरात दत्त चौक, पाटण कॉलनी, कृष्णा घाटावर भेटी देऊन पाहणी केली. भाजपचे नेते विक्रम पावसकर, माजी नगराध्यक्ष जयवंतराव पाटील, सुहास जगताप, स्मिता हुलवान, सुहास पवार, आप्पा माने, शिवराज इंगवले, प्रांत अतुल म्हेत्रे, पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील, तहसीलदार कल्पना ढवळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तहसिलदार, मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांच्यासह अधिकारी व नागरिक उपस्थित होते.
डॉ. अतुलबाबांनी दत्त चौक येथे नागझरी नाल्याची पाहणी केली. कोयना कालनीला पुराचा धोका असल्याने येथे संरक्षक भिंतीची गरज असल्याचे माजी नगरसेविका स्मिता हुलवान यांनी निदर्शनास आणून दिले. पाटण कॉलनी येथे डॉ. भोसले यांनी नागरिक व महिलांशी चर्चा केली. कृष्णा घाटावर पाहणी केली. शाळा क्रमांक तीनमध्ये स्थलांतरित कुटुंबाच्या सुविधांची पाहणी केली. पाहणीनंतर विश्रामगृह येथे अधिकारी यांच्याकडून आढावा घेतला.
पूरस्थिती निर्माण झाली असून लोक पाणी पाहण्यासाठी जातात. मात्र, नागरिकांनी पूर पर्यटन करू नये. एखादी दुर्घटना घडल्यास प्रशासनावर ताण येतो. त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी सतर्क राहावे. पूरकाळात साथरोगांचा धोका असल्याने औषधसाठा करून ठेवावा. अशा रूग्णांसाठी उपजिल्हा रूग्णालयात राखीव बेड ठेवावेत. नदीकाठच्या गॅबियन भिंत सिमेंटने भरून घेण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात येईल. नागरिकांना अवजड व मौल्यवान सामान सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी प्रशासनाकडून विशेष व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मदतकार्य सुरू करण्याच्या आणि गरजेनुसार पुनर्वसनाची तयारी ठेवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या. पूर परिस्थिती निर्माण झाल्यास जनतेला कोणताही त्रास होणार नाही यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहेत. आपत्ती काळात सर्व अधिकाऱ्यांनी आपले काम चोख बजवावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.