आमदार कोल्हापुरात दाखल, मंत्रीपदासाठी वेटींग
कोल्हापूर :
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दूसऱ्या दिवशी सकाळीच तातडीन खास विमानाने मुंबईला गेलेले जिल्ह्यातील महायुतीचे सर्व आमदार पुन्हा कोल्हापुरात दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री पदाचा चेहरा अद्याप स्पष्ट न झाल्याने मंत्री पदासाठी हालचालीही थंडावल्या आहेत. त्यामुळे मुंबईला गेलेले जिल्ह्यातील महायुतीचे आमदार पुन्हा कोल्हापूरात परतले आहे. मुख्यमंत्री पदाचा चेहरा निश्चित झाल्यानंतर मंत्री पदांच्या हालचाली गतीमान होतील. तुर्तास तरी कोल्हापूरात परतलेले सर्व आमदार कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी व शुभेच्छा स्विकारण्यात व्यस्त आहेत.
राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल 23 रोजी जाहीर झाले. यामध्ये महायुतीने राज्यात एकहाती वर्चस्व मिळविले आहे. जिल्ह्यातील सर्व दहा विधानसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार विजयी झाले. जिल्ह्यात महायुतीला प्रथमच इतक्या मोठयाप्रमाणात यश मिळाले. निवडणुकांचे निकाल लागताच सर्व विजयी उमेदवार तत्काळ रवाना झाले. महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा निश्चित न झाल्याने सत्तास्थापनेची प्रक्रीय लांबणीवर पडली. यामुळे मंत्री पदाच्या हालचालीही थंडावल्या. जिल्ह्यातून मंत्री पदासाठी आमदार हसन मुश्रीफ, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार डॉ. विनय कोरे यांची नावे चर्चेत आहेत. यापैकी कोणाकोणाची मंत्री मंडळात वर्णी लागणार हे पुढील काळात स्पष्ट होईल.
भाजपचे जिल्ह्यात दोन आमदार निवडून आले आहेत. तर जनसुराज्यचे दोन आणि चंदगडचे अपक्ष आमदार शिवाजी पाटील यांचा भाजपला पाठींबा आहे. भाजपचे आमदार अमल महाडिक यांनी आपण मंत्री पदाच्या रेसमध्ये नसल्याचे स्पष्ट केले आहे. तर भाजपचे आमदार राहूल आवाडे, जनसुराज्यचे आमदार अशोकराव माने आणि अपक्ष आमदार शिवाजी पाटील यांची पहिलीच टर्म असल्याने त्यांना मंत्रीमंडळात स्थान मिळणार का असा प्रश्न आहे. त्यामुळे जिल्ह्यात भाजपच्या कोट्यातून जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक आमदार डॉ. विनय कोरे यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपकडून जिल्ह्यात कोणाला मंत्री पद मिळणार याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्ह्यात एकमेव आमदार असल्याने हसन मुश्रीफ यांना मंत्री पद मिळण्याची दाट शक्यता आहे. तर शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी हॅटट्रीक केली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीची सत्ता आल्यास आबिटकर मंत्री असतील असे वक्तव्य आबिटकर यांच्या प्रचारा दरम्यान केले होते. तसेच कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांची देखिली तिसरी टर्म असून ते मुख्यमंत्री शिंदे यांचे निकटवर्तीय आहेत. ते पालकमंत्री पदासाठी आग्रही आहेत. तर आमदार चंद्रदीप नरके यांची देखिल हि तिसरी टर्म असून मंत्री पदासाठी ते ही ताकद लावणार आहेत. त्यामुळे शिवसेनेकडून कोणाला मंत्री पद मिळणार हे देखिल औत्सुक्याचे असणार आहे.