मियावाकी जंगलाला लागले ग्रहण
सातारा :
सातारा शहराच्या सोनगाव कचरा डेपोतले वातावरण चांगले रहावे, कचरा डेपोत आगी लागू नयेत यासाठी पालिकेच्यावतीने चार वर्षापूर्वी मियावाकी जंगल तयार करण्यात आले होते. मात्र, या जंगलाला ग्रहण लागले असून सध्या या जंगलात फक्त ३० टक्केच झाडे शिल्लक राहिल्याचे दिसत असून पालिकेने या मियावाकी जंगलाची देखभाल दुरुस्ती करण्याकरिता नेमण्यात आलेला कर्मचारीच तिकडे फिरकत नसल्याने हे ग्रहण लागले असल्याचे बोलले जात आहे.
सोनगाव कचरा डेपोत दररोज सुमारे २० टन कचरा सातारा शहर व परिसरातील पडतो. त्या कचऱ्यापासून कोणतेही प्रदूषण होऊ नये. कचरा डेपोला कचऱ्याच्या उष्णतेमुळे आग लागू नये, कचरा डेपोतील वातावरण हे थंड रहावे याकरता सातारा पालिकेच्यावतीने मियावाकी जंगल गेल्या चार वर्षापूर्वी करण्यात आले होते. त्यावेळी झाडे अतिशय लहान होती. त्याच झाडापैकी आता ३० टक्के झाडे शिल्लक असल्याचे सांगण्यात येते.
दरम्यान, मियावाकी जंगलातील सगळी झाडे चांगली टिकली असती तर तिथले वातावरण सुद्धा चांगले राहिले असते. परंतु त्या झाडांना ग्रहण लागले असून ७० टक्के झाडांपैकी ३० टक्के झाडे शिल्लक राहिली आहेत. त्याला कारण सांगितले जाते की या मियावाकी जंगलाच्या देखभालीकरिता एका कर्मचाऱ्याची पालिकेने नियुक्ती केली होती. तो कर्मचारीच या जंगलाकडे फिरकला नसल्याने ३० टक्के झाडेच शिल्लक राहिली असल्याचे बोलले जात आहे. सोनगाव कचरा डेपोतल्या या मियावाकी जंगलाची त्यावेळी चांगली चर्चा झाली होती. परंतु नव्याचे नऊ दिवस संपताच पुन्हा त्याकडे दुर्लक्ष झाल्याने ३० टक्केच झाडे शिल्लक असल्याचे सांगण्यात येत आहे.