‘चौथा स्तंभ’ची सुवर्णभरारी; सुकळवाड येथील एमआयटीएम इंजिनिअरिंग कॉलेजला मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवात सुवर्णपदक
सिंधुदुर्गनगरी | प्रतिनिधी : मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सव 2026 मध्ये सुकळवाड येथील एमआयटीएम इंजिनिअरिंग कॉलेजने सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत सिंधुदुर्गच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्राची मान उंचावली आहे. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘चौथा स्तंभ’ या स्किटने अंतिम फेरीत प्रभावी सादरीकरण करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात राज्यातील विविध भागांतील महाविद्यालयांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. यंदाच्या स्पर्धेत विविध 12 झोनमधून तब्बल 330 स्किट सादर करण्यात आले. या सर्व सादरीकरणांमधून अंतिम फेरीसाठी केवळ दोन स्किटची निवड करण्यात आली. त्यामध्ये एमआयटीएम इंजिनिअरिंग कॉलेजच्या ‘चौथा स्तंभ’ या स्किटचा समावेश झाला.
अंतिम फेरीत एमआयटीएमच्या विद्यार्थ्यांनी प्रभावी अभिनय, संवादफेक आणि सांघिक सादरीकरणाच्या माध्यमातून परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या सादरीकरणाला मिळालेल्या प्रतिसादामुळे ‘चौथा स्तंभ’ने अंतिम फेरीत सुवर्णपदक पटकावले.
या यशामुळे सिंधुदुर्गच्या शैक्षणिक तसेच सांस्कृतिक क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळालेल्या या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल एमआयटीएम इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विजेत्या विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचा विशेष सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, पुस्तक आणि वृक्षरोप देऊन गौरविण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे आणि सांघिक प्रयत्नांचे कौतुक करण्यात आले.
सत्कार समारंभाला संचालक अशोक सावंत, संचालक केतन कदम आणि अधिष्ठाता पूनम कदम यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
‘चौथा स्तंभ’च्या या यशामुळे विद्यार्थ्यांमधील अभिनय, सादरीकरण आणि सांस्कृतिक कलागुणांना व्यासपीठ मिळाल्याचे अधोरेखित झाले असून, युवा महोत्सवातील या सुवर्ण कामगिरीमुळे एमआयटीएमच्या शैक्षणिक वाटचालीत आणखी एक महत्त्वपूर्ण यशाची नोंद झाली आहे.