‘भूत बंगला’मध्ये मिथिलाची एंट्री
स्त्राr आणि मुंज्या यासारख्या चित्रपटांच्या यशानंतर बॉलिवूडमध्ये हाँटेड कॉमेडी चित्रपटांचा जणू पूरच आला आहे. आता अक्षय कुमारच्या भूत बंगला चित्रपटात हाँटेड कॉमेडी पहायला मिळणार आहे. अक्षय कुमारसोबत या चित्रपटात तब्बू दिसून येणार आहे. आता या चित्रपटात आणखी एका अभिनेत्रीची एंट्री झाली आहे. मिथिला पालकरला अक्षयसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. तब्बू, परेश रावल, राजपाल यादव, असरानी आणि वामिका गब्बी देखील यात मुख्य भूमिकेत असणार आहे. मिथिला या चित्रपटात अक्षय कुमारच्या बहिणीची भूमिका साकारणार आहे. मिथिलाने याचे चित्रिकरण सुरू केले आहे. भूत बंगला चित्रपटाचे चित्रिकरण मार्चपर्यंत संपणार आहे. प्रियदर्शन यांच्या दिग्दर्शनात तयार होणाऱ्या या चित्रपटात दिग्गज कलाकार असल्याने चाहते त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. हा चित्रपट 2 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. प्रियदर्शन आणि अक्षय कुमारच्या जोडीने हेरा फेरी, भूल भुलैया, गरम मसाला, भागम भाग आणि खट्टा मीठा यासारखे चांगले चित्रपट दिले आहेत. अक्षय कुमारचा स्काय फोर्स हा चित्रपट अलिकडेच प्रदर्शित झाला असून तो बॉक्स ऑफिसवर यशस्वी देखील ठरला आहे.