For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शेतीच्या मोफत वीजपुरवठ्याचा गैरवापर

12:06 PM Jan 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
शेतीच्या मोफत वीजपुरवठ्याचा गैरवापर
Advertisement

थ्री फेजचा वापर व्यावसायिक कारणासाठी, संबंधितांवर कारवाईची आवश्यकता

Advertisement

बेळगाव : राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना कूपनलिकांसाठी मोफत वीजपुरवठा केला जातो. परंतु, मागील काही दिवसांपासून मोफत वीज घेऊन टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा व्यवसाय सुरू आहे. एकीकडे सरकारकडून मोफत वीज घ्यायची आणि दुसरीकडे 600 ते 700 रुपये प्रतिटँकरने पाणीविक्री करायची. हा धंदा सध्या जोरात सुरू आहे. त्यामुळे या प्रकाराला आळा घालणे गरजेचे आहे. यावर्षी दुष्काळाची स्थिती असल्याने डिसेंबर महिन्यापासूनच पाण्याची कमतरता जाणवू लागली आहे. धरणांमधील पाणीसाठा मर्यादित असल्याने आठ दिवसातून एकदा शहर तसेच ग्रामीण भागात पाणीपुरवठा केला जात आहे. याचा फायदा टँकरचालक उठवत आहेत. मागील वर्षी 300 ते 400 रुपये असणारा पाण्याचा टँकर यावर्षी मात्र 600 ते 700 रुपयांपर्यंत वाढविण्यात आल्याने नाराजी व्यक्त होत आहे.राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी मोफत वीजपुरवठा दिला आहे. हेस्कॉमकडून शेतकऱ्यांना थ्री फेज मोफत विद्युतपुरवठा केला जातो. परंतु, याचा वापर व्यावसायिक कारणासाठी केला जात आहे. शहरालगत शिवारांमध्ये कूपनलिकांची खोदाई करून त्यांचे पाणी टँकरद्वारे शहरात अव्वाच्या सव्वा दराने विक्री केले जात आहे. यामुळे ज्या शेतकऱ्यांना विजेची खरी गरज आहे, त्यांना मात्र वीज मिळत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अशा टँकरचालकांवर कारवाईची मागणी केली जात आहे.

हेस्कॉमचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

Advertisement

हेस्कॉमकडून शेतकऱ्यांना वीजपुरवठा केल्या जाणाऱ्या थ्री फेज कनेक्शनची संपूर्ण माहिती संबंधित लाईनमन व सेक्शन ऑफिसरला असते. परंतु, मोफत थ्री फेज कनेक्शनवरून व्यावसायिक कामे करणाऱ्यांकडे चिरीमिरीसाठी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवरही दंडात्मक कारवाईची गरज निर्माण झाली आहे.

खरे लाभार्थी योजनेपासून दूर

हेस्कॉमकडून शेतकऱ्यांसाठी मोफत थ्री फेज विद्युतपुरवठा केला जातो. परंतु, काही शेतकरी मात्र या कनेक्शनद्वारे व्यावसायिक वापर करीत आहेत. अशांमुळे खरे लाभार्थी योजनेपासून दूर रहात आहेत. त्यामुळे व्यावसायिक वापर करणाऱ्या शेतकऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणे गरजेचे आहे.

- राजू मरवे (शेतकरी संघटनेचे पदाधिकारी)

Advertisement
Tags :

.