मिशनरी फिल्मकार!
भारतीय चित्रपटसृष्टीतील एक ज्येष्ठ अभिनेते, फिल्मकार मनोज कुमार यांनी या जगाचा वयाच्या 87 व्या वर्षी निरोप घेतला. भारतात देशभक्तीपर चित्रपट निर्माण करणारे आणि लोकांना प्रभावित करणाऱ्या लोकप्रिय चित्रपटांचे नायक म्हणून जगभर त्यांची ख्याती होती. चित्रपट हा सर्जनशील आणि कल्पक कलाव्यवसाय आहे. तो केवळ व्यवसाय नाही. चित्रपटकर्मी हा समाजाशी बांधील असतो, तुम्ही ज्या समाजाचा भाग आहे त्या समाजाची नीतिमूल्यं, संस्कार, प्रेरणा या त्याच्या कलाकृतीतून उमटायलाच हव्यात असा आग्रह धरणारे आणि आपल्या कलेतून तो जपणारे मनोज कुमार पुन्हा होणे नाहीत. त्यामुळेच त्यांना मिशनरी फिल्मकार असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. ते 1960 ते 1980 च्या दशकातले एक महत्त्वाचे हिंदी चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक आणि पटकथाकार होते, विशेषत: त्यांची ‘भारत’ या विषयाभोवती असलेली ओळख अढळ होती. त्यांना लोक ‘भारत कुमार’ म्हणूनही ओळखतात. त्यांचे चित्रपट केवळ मनोरंजनापुरते मर्यादित नव्हते, तर त्यात देशभक्ती, सामाजिक संदेश, भारतीय मूल्यं, परंपरा यांचं प्रभावी मिश्रण असे. त्यांच्या चित्रपटांनी भारतीय माणसांच्या मनोभूमिकेवर खोलवर परिणाम केला हे नाकारता येणार नाही. स्वातंत्र्यानंतरच्या रम्य काळात 1965 मध्ये आलेला त्यांचा ‘शहीद’ हा हुतात्मा भगतसिंग यांच्या जीवनावरील चित्रपट देशभक्तीचा सूर प्रबळ करणारा ठरला होता. ‘सरफरोशी की तमन्ना’, ‘रंग दे बसंती चोला’ या गीतांनी भारतीय तरुणांत आजही जोश निर्माण होतो. 65 साली भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर 1967 साली आलेल्या ‘उपकार’बद्दल सांगतात की, पंतप्रधान लालबहादूर शास्त्राr यांनी ‘जय जवान, जय किसान’ ही घोषणा दिली होती. त्या घोषणेला जनमानसात रुजवण्यासाठी चित्रपट बनवावा असे शास्त्राrजींनी सांगितले होते. त्यातीलच ‘मेरे देश की धरती सोना उगले...’ हे गाणे सदा सर्वकाळ देशभक्तीचे प्रतीक ठरले. या काळात देश गव्हावर संशोधन करत होता. हा चित्रपट पाहण्यासाठी शास्त्राrजी जिवंत नव्हते. मात्र त्यांनी दाखवलेला विश्वास मनोज कुमार यांनी सार्थ ठरवला होता. या चित्रपटातीलच भारत या पात्राचे नाव त्यांच्याशी जोडले जाऊन त्यांना ‘भारत कुमार’ म्हटले जाऊ लागले. 1970 सालचा ‘पूरब और पश्चिम’ हा भारतीय आणि पाश्चिमात्य संस्कृतीवर प्रभाव टाकणारा चित्रपट अनिवासी भारतीयांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरला आणि कुठेही गेलो तरी आपल्या देशाला विसरायचे नाही ही भावना देशात आणि परदेशातील भारतीयांमध्ये कायमची दृढ झाली. 1974 चा काळ येता येता सर्वसामान्य माणसाची परवड आणि अन्याय विरोधातील व्यथीत समाज, गरीबी हटावची फसलेली घोषणा यामुळे समाज हतबल झाला. त्याचे चित्रण ‘रोटी कपडा और मकान’ या चित्रपटाने केले. पुढच्या एका वर्षातच भारतात सरकारविरोधी वातावरण निर्माण होऊन आणीबाणीची वेळ आली. काही अंशी इंदिरा सरकारविरोधी जनमत तयार करण्यास हा चित्रपट यशस्वी ठरला. आणीबाणी आणि जनता सरकार गडगडून तरुणांमध्ये निराशा वाढल्या नंतरच्या काळात देशात पुन्हा देशभक्तीचे वातावरण निर्माण व्हावे या भावनेने 1981 मध्ये त्यांचाच ‘क्रांती’ हा चित्रपट आला. लोकांनी त्याला तुफान प्रतिसाद दिला. त्यानंतर आठ वर्षांनी 1989 मध्ये ‘क्लर्क’ हा चित्रपट त्यांनी निर्माण केला. त्या काळातील राजीव सरकारवर बोफोर्स भ्रष्टाचाराचा आरोप झाला. तेव्हा भ्रष्टाचाराचे आणि त्याचे भविष्यात होणारे अक्राळ, विक्राळ स्वरूपाचे त्यांनी चित्रण केले होते. पण, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आलेला हा चित्रपट सपशेल पडला आणि मनोज कुमार यांची या क्षेत्रातील सक्रियता देखील संपली. ती आजतागायत. या दरम्यान चित्रपट अॅक्शन प्रधान झाला. मिथून सारख्या नृत्यावर डोलवणाऱ्या कलाकारांच्या चलतीचा काळ आला. या पिढीला उपदेश, आदर्शवाद नकोसा झाला होता. मनोज कुमारचे चित्रपट हे केवळ सिनेमॅटिक मनोरंजन नव्हते तर ते त्या त्या काळातील राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक वास्तवाचे आणि जनतेच्या मनाचे प्रतिबिंब होते. ही स्थिती बदलण्याबाबत त्यांचा आशावाद भाबडा नव्हता मात्र त्यांचे प्रयत्न अपुरे राहिले असे म्हणता येईल. चित्रपट वास्तवाचे प्रतिबिंब असले तरी तो समकालीन आर्ट फिल्म किंवा समांतर चित्रपटाप्रमाणे पूर्ण वास्तववादी नव्हता. त्यात भावना, गीते, देशभक्ती, उपदेश यांचा मसाल्याप्रमाणे वापर केला होता. त्याचमुळे त्या काळातील बेनेगल वगैरे दिग्दर्शकांच्या समांतर फिल्मने शोषण, जातीव्यवस्था, दारिद्रय, लिंगभेद आणि असमानता या विषयावर थेटपणे जे वास्तव चित्रण केले तिथेपर्यंत मनोज कुमार पोहोचू शकणार नव्हते. कारण बॉक्स ऑफिसवर यशस्वी होणे आणि खूप मोठ्या वर्गाला प्रभावीत करणे ही मनोज कुमार यांच्या चित्रपटांची यशासाठीची गरज होती. त्यांनी इतरांच्या यशासाठीही हा मसाला पुरवण्याचे काम केले. ‘डॉन’ मधील ‘खैके पान बनारस वाला’ हे गाणे चित्रपटात आधी नव्हते...ते चित्रपटाच्या उत्त्तरार्धाला समतोल देईल हे मनोज कुमार यांनी दिग्दर्शकास सुचवले. तसेच ‘वो कौन थी’ या चित्रपटातील ‘लग जा गले’ हे गाणे कापण्यात येणार होते. ही धक्कादायक गोष्ट मनोज कुमार यांनी उधळून लावली आणि हे गाणे माईलस्टोन ठरेल याची खात्री त्यांनी निर्मात्यांना दिली. मनोजकुमार यांनी दिग्दर्शित केलेल्या 7 चित्रपटांपैकी 5 चित्रपटांनी उत्पन्नाचा इतिहास रचला. ही उदाहरणे पाहता त्यांच्याकडील व्यावसायिक हुशारी लक्षात येते. वास्तववादी आणि अतिरंजीत हा फरक भारतीय चित्रपटसृष्टीत कायम राहिला. मात्र ज्या विषयी मनोज कुमार देखिल तक्रार करायचे ते आजचे मेंदू बाजूला ठेवून पाहायचे चित्रपट भारतीय प्रेक्षकांच्या पदरात पडले आहेत. अर्थात जवान, न्यूटन, आर्टिकल 15 असे सन्माननीय अपवादही आहेतच. पण भारावलेल्या अवस्थेतील एका मिशनरी चित्रपट निर्मात्यापासून ते बिनडोक चित्रपटांच्या गर्दीपर्यंत भारतीय चित्रसृष्टीचा झालेला प्रवास पाहता अशा काळात मनोज कुमार यांच्यासारखा दिग्दर्शक नाही ही मोठी खंत आहे. तिथे निहलानी, बेनेगल तर खूपच दूर. मनोज कुमार यांना अभिवादन.