Miraj : मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ‘मिशन इंद्रधनुष्य’ सुरू; 7 दिवस 7 रंगांची बेडशीट
मिशन इंद्रधनुष्य’ राज्यातील पहिलाच प्रयोग
सांगली : मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात आजपासून ‘मिशन इंद्रधनुष्य बेडशीट’ हा अनोखा आणि राज्यातील पहिलाच उपक्रम सुरू करण्यात आला आहे. रुग्णालयातील स्वच्छता, शिस्त आणि रुग्णांना सकारात्मक वातावरण मिळावे,
यासाठी आठवड्यातील प्रत्येक दिवशी नवीन व वेगळ्या रंगाची बेडशीट लावली जाणार आहे. सोमवार जांभळा, मंगळवार गुलाबी, बुधवार निळा, गुरुवार हिरवा, शुक्रवार पिवळा, शनिवार नारंगी आणि रविवार पांढरा - असा सात दिवसांचा रंगक्रम रुग्णांसाठी लागू झाला आहे.
सध्या रुग्णालयात २५० हून अधिक बेड्स असून दररोज ताजी बेडशीट ठेवण्यासाठी विशेष लॉन्ड्री टीम आणि मॉनिटरिंग सिस्टीम तयार करण्यात आली आहे. बेडशीट बदलली जाते का, स्वच्छतेचे पालन होते का आणि रुग्णांना सुरक्षित वातावरण मिळते का, याची पाहणी आता रंग बदलण्यावरून सहज करता येणार आहे.
रुग्णालय प्रशासनाने सांगितले की, या उपक्रमामुळे स्वच्छता व्यवस्थापन अधिक पारदर्शक होईल आणि रुग्णांचा विश्वास वाढेल. रुग्ण व नातेवाईकांकडून या उपक्रमाचे स्वागत होत आहे.