For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

58 व्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी ‘मिशन चॅम्पियन’ सज्ज!

06:21 AM Jan 11, 2026 IST | Tarun Bharat Portal
58 व्या राष्ट्रीय खो खो स्पर्धेसाठी  ‘मिशन चॅम्पियन’ सज्ज
Advertisement

मुंबई उपनगरचा निहार दुबळे व पुण्याची रितिका राठोड कर्णधारपदी :  काजीपेठ, तेलंगणा येथे आजपासून स्पर्धेला प्रारंभ

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई, पुणे

अस्सल मराठी मातीतील खेळ असलेल्या खो-खोचा रणसंग्राम आता तेलंगणाच्या भूमीत पेटणार असून महाराष्ट्राची फौज जेतेपदाचा झेंडा रोवण्यासाठी सज्ज झाली आहे. काजीपेठ (तेलंगणा) येथील रेल्वे ग्राउंडवर 11 ते 15 जानेवारी दरम्यान होणाऱ्या 58 व्या पुरुष व महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्र खो-खो असोसिएशनने आपले पुरुष व महिला संघ जाहीर केले आहेत. हे संघ सहभागापुरते नसून जेतेपदावर दरारा निर्माण करण्याच्या निर्धाराने मैदानात उतरले आहेत. स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबिर बीड येथील राजश्री शाहू कन्या शाळेच्या मैदानावर यशस्वीरीत्या पार पडले. शिबिराचा समारोप महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे माजी सरचिटणीस जनार्दन शेळके व सरचिटणीस डॉ. चंद्रजीत जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. दोन्ही संघ सुवर्णपदक जिंकतील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यानंतर महाराष्ट्राचे दोन्ही संघ काजीपेठ, तेलंगणा येथे रवाना झाले.

Advertisement

गटवारीचा थरार : ‘अ‘ आणि ‘ब‘ गटात महाराष्ट्र सज्ज

भारतीय खो-खो महासंघाच्या गटवारीनुसार पुरुष संघ ‘ब‘ गटात असून उत्तर प्रदेश, मणिपूर, जम्मूकाश्मीर व मेघालय यांच्याशी लढत देणार आहे. महिला संघ ‘अ‘ गटात असून उत्तर प्रदेश, छत्तीसगड, अरुणाचल प्रदेश व चंदीगड ही आव्हाने असतील. दोन्ही गटांत फेव्हरेट म्हणून महाराष्ट्र आपली ताकद दाखवणार आहे.

पुरुष संघ : कर्णधार : निहार दुबळे (मुंबई उपनगर) यांच्या नेतृत्वाखाली पुरुष संघात अनुभवाची भक्कम फळी आहे. संघात शुभम थोरात, प्रतिक वाईकर, सुयश गरगटे, रुद्र थोपटे (सर्व पुणे), अनिकेत चेंदवणकर, निहार दुबळे (कर्णधार), प्रतिक देवरे, ऋषिकेश मुर्चावडे (सर्व मुंबई उपनगर), विजय शिंदे, सचिन पवार (सर्व धाराशिव), अक्षय मासाळ, अभिषेक केरीपाळे (सर्व सांगली), शुभम उतेकर (ठाणे), वेदांत देसाई (मुंबई), तुकाराम कारंडे (बीड) यांचा समावेश आहे.

महिला संघ : कर्णधार : रितिका राठोड (पुणे) यांच्या नेतृत्वाखाली महिला संघात धाराशिवचे वर्चस्व दिसून येते. संघात अश्विनी शिंदे, संध्या सुरवसे, सुहानी धोत्रे, संपदा मोरे, मैथिली पवार, तन्वी भोसले (सर्व धाराशिव), प्रियांका इंगळे, कोमल दारवटकर, श्वेता नवले, रितिका राठोड (कर्णधार) (सर्व पुणे), रेश्मा राठोड, पूजा फरगडे (सर्व ठाणे), सरिता दिवा (नाशिक), प्रतिक्षा बिराजदार (सांगली), पायल पवार (रत्नागिरी) या रणरागिणी मैदानात उतरतील.

Advertisement
Tags :

.