तुडये येथील बेपत्ता तरुणाचा कावळेवाडीतील विहिरीत मृतदेह
तीन महिन्यांपासून होता बेपत्ता
प्रतिनिधी/ बेळगाव
गेल्या तीन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या तुडये (ता. चंदगड) येथील एका तरुणाचा मृतदेह शनिवारी कावळेवाडी येथील विहिरीत सापडला आहे. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
विक्रम नारायण मोहिते (वय 27) रा. तुडये असे त्याचे नाव आहे. दि. 16 सप्टेंबर 2024 रोजी बिजगर्णी येथील आपल्या नातेवाईकांच्या घरी आला होता. त्याची मानसिक स्थिती ठीक नव्हती. त्याचदिवशी रात्री आपला मोबाईल घरातच सोडून मोटारसायकलवरून तो निघून गेला होता. मोटारसायकल व चप्पल बिजगर्णी येथील मारुती सुरतकर यांच्या जमिनीत सोडून तो बेपत्ता झाला होता.
कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यादीवरून बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात या घटनेची नोंद करण्यात आली होती. सर्वत्र शोध सुरू असतानाच शनिवार दि. 21 डिसेंबर रोजी कावळेवाडी येथील विजय रवळू यळ्ळूरकर यांच्या शेतजमिनीतील विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला आहे. सुमारे 35 ते 40 फूट खोल विहिरीतील मृतदेह काढण्यासाठी एचईआरएफ रेस्क्यू टीमचे बसवराज हिरेमठ, भरत नायक, ओम पाटील, श्रवण पोटे व स्थानिक नागरिकांनी प्रयत्न केले. तासाभराच्या प्रयत्नानंतर विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला.