मिसिंग लिंकवर अवजड वाहनांना बंदी; प्रवासी वाहनांना वेगमर्यादा, नवीन नियम जाहीर
लोणावळा: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बहुचर्चित 'मिसिंग लिंक' या मार्गावर वाहनांसाठी नवे वाहतूक नियम जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये अवजड वाहनांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून, प्रवासी वाहनांना वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
महाराष्ट्राच्या अपर पोलीस महासंचालक वाहतूक विभागाकडून २६ ऑक्टोबर रोजी यासंदर्भातील अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली असून, येत्या १ नोव्हेंबर पासून या नियमांची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होणार आहे. बोगद्यांमधील तांत्रिक बाबी आणि प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी हा मोठा निर्णय घेतला आहे.
यामध्ये कार व हलक्या खासगी वाहनांसाठी ताशी १०० किमी, तर प्रवासी बससाठी ताशी ८० किमी वेगमर्यादा ठरविण्यात आली आहे. मिसिंग लिंकवर सर्व प्रकारच्या मालवाहू वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आल्यामुळे, या वाहनांना आता मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेच्या मूळ जुन्या मार्गिकचाच वापर हा करावा लागणार आहे. बोगद्यातील अपघात टाळण्यासाठी निर्णय घेण्यात आला असून वाहनचालकांनी या नियमांचे तंतोतंत पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.
मालवाहू वाहनांना कायमस्वरूपी प्रवेशबंदी
यापूर्वी परवानगी असलेल्या पिकअप व्हॅन आणि टाटा एस यांसारख्या हलक्या मालवाहू वाहनांसह आता सर्वच प्रकारच्या लहान-मोठ्या मालवाहू वाहनांना मिसिंग लिंकवर कायमस्वरूपी प्रवेशबंदी घालण्यात आली आहे, तसेच ज्वलनशील, स्फोटक आणि धोकादायक पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनांनाही या मार्गावर बंदी असेल.
