क्षेपणास्त्र चाचणीमुळे हवाई प्रवासासाठी ‘नोटम’
17 ते 20 डिसेंबरला ‘नो-फ्लाय झोन’
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारत सरकारने संभाव्य क्षेपणास्त्र चाचणीमुळे बंगालच्या उपसागरातील धोक्याच्या क्षेत्राचा विस्तार करण्यासाठी गुरुवारी अधिसूचना जारी केली आहे. क्षेपणास्त्र चाचणीमुळे विमान कंपन्यांसाठी नोटम (नोटीस टू एअरमन) जारी करण्यात आला असून विमाने आणि सागरी वाहतुकीवर तात्पुरत्या स्वरुपात मर्यादा घातल्या जाणार आहेत. सदर ‘नो-फ्लाय झोन’ आता 2,520 किमी पर्यंत वाढवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. 17 ते 20 डिसेंबर 2025 दरम्यान होणारी ही चाचणी भारताच्या धोरणात्मक संरक्षण क्षमता मजबूत करण्याचा एक भाग आहे. या चाचणीत के-4 पाणबुडी-प्रक्षेपित बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात येणार आहे. या क्षेपणास्त्राची रेंज 3,500 किमीपर्यंतची असल्यामुळे सावधानता बाळगण्यात येणार आहे. 17 ते 20 डिसेंबर 2025 पर्यंत सकाळी 6 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ही चाचणी सक्रिय असेल. या काळात, नागरी उ•ाणे आणि जहाजे या क्षेत्रापासून दूर राहतील. या सर्व परिस्थितीवर भारतीय नौदल आणि हवाई दल निरीक्षण ठेवणार आहे.