For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतात येणाऱ्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला

06:13 AM Apr 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारतात येणाऱ्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
Advertisement

लाल समुद्रातील घटना : हुथी बंडखोरांनी स्विकारली जबाबदारी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

येमेनच्या हुथी बंडखोरांनी शनिवारी भारतात येणाऱ्या जहाजावर क्षेपणास्त्राने हल्ला केला. हा हल्ला लाल समुद्रात करण्यात आला. खुद्द हुथी बंडखोरांनी एक निवेदन जारी करून ही माहिती दिली आहे. हुथी बंडखोर गेल्या अनेक महिन्यांपासून लाल समुद्र आणि एडनच्या आखातातून जाणाऱ्या जहाजांवर हल्ले करत आहेत. हल्ल्यामुळे जहाजाचे नुकसान झाल्याचे ब्रिटनच्या सागरी सुरक्षा फर्म आंब्र्रेने म्हटले आहे.

Advertisement

लाल समुद्रात हल्ला करण्यात आलेल्या जहाजावर पनामाचा ध्वज असून ते एका ब्रिटीश कंपनीच्या मालकीचे होते. हे जहाज नुकतेच विकण्यात आले असून आता हे जहाज सेशेल्स कंपनीच्या मालकीचे असल्याचे बोलले जात आहे. या जहाजावर तेलाचे टँकर असून ते रशियातील प्रिमोर्स्क येथून भारतातील वाडीनारकडे येत होते. या हल्ल्यानंतर जहाजाचे कितपत नुकसान झाली यासंबंधीची माहिती अद्याप जारी करण्यात आलेली नाही. तरीही भारतीय नौदल या जहाजावरील यंत्रणेशी संपर्कात असून आवश्यक मदत पुरविली जात असल्याचे सांगण्यात आले.

इस्रायल-हमास युद्धापासून इराण समर्थित हुथी बंडखोर लाल समुद्र आणि एडनच्या आखातातून जाणाऱ्या जहाजांना लक्ष्य करत आहेत. पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ हुथी बंडखोर हे कृत्य करत असून यापूर्वी त्यांचे लक्ष्य फक्त इस्रायलची जहाजे होती. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून इतर देशांच्या जहाजांनाही लक्ष्य केले जात आहे. वाढत्या हल्ल्यांमुळे अनेक शिपिंग कंपन्या आपली जहाजे दक्षिण आफ्रिकेत लांबच्या मार्गाने पाठवत आहेत. परिणामत: माल वाहतुकीचा खर्च वाढला असून जागतिक स्तरावर महागाईही वाढली आहे.

...तरीही हुथी बंडखोरांचे कारनामे

अलीकडेच आंतरराष्ट्रीय शिपिंग मार्गांवरून जाणाऱ्या जहाजांना लक्ष्य करणाऱ्या येमेनमधील हुथी बंडखोरांच्या स्थानांवर अमेरिका आणि ब्रिटनच्या सैन्याने हवाई हल्ले केले होते. असे असूनही हुथी बंडखोरांचे हल्ले थांबलेले नाहीत. भारताने अरबी समुद्र आणि एडनच्या आखातातही आपले नौदल तैनात केले असून युद्धनौकांसह पाळतही वाढवली आहे.

Advertisement
Tags :

.