दुराग्रही केंद्रप्रमुखामुळे परीक्षेची संधी हुकली
सरकारी कर्मचाऱ्यांनाच परीक्षेला बसण्यास अटकाव
त. भा. प्रतिनिधी
बेळगाव
केपीएससीच्या परीक्षांसाठी आलेल्या परीक्षार्थिंना दुराग्रही केंद्र प्रमुखामुळे परीक्षेची संधी हुकल्याची घटना मंगळवारी शहरात घडली. विशेष म्हणजे परीक्षेला बसणारे सर्व परीक्षार्थी हे सरकारी कर्मचारी असतानाही वेळेचे कारण देत परीक्षेला बसण्यास अटकाव करण्यात आला. परंतु परीक्षार्थिंनी आपण वेळेपूर्वी परीक्षा केंद्रात आल्याचे सांगून केंद्रप्रमुखांच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला.
सरकारी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ, बढती यासाठी केपीएससीच्या परीक्षा देणे आवश्यक असते. वर्षातून एकदा ही परीक्षा घेतली जाते. 17 जुलैपासून शहरातील 9 केंद्रांवर या परीक्षा घेतल्या जात आहेत. सकाळी 10 ते दुपारी 12 व दुपारी 2 ते सायंकाळी 4 यावेळेत परीक्षा घेतल्या जात आहेत.
मंगळवारी शहरातील बेननस्मिथ परीक्षा केंद्रावर विद्यार्थी दाखल झाले. सकाळी 9.55 वाजता प्रवेशद्वार बंद करण्यात येत होते. त्यावेळी काही परीक्षार्थी गेटसमोर दाखल झाले. परंतु सुरक्षा रक्षकाने त्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात सोडले नाही. आठ ते दहा परीक्षार्थी गेटवर उभे होते. ते विनवणी करीत होते. परंतु त्यांना आत जाण्याची परवानगी देण्यात आली नाही. महिला पोलीस कर्मचारी हतबलतेने पाहात उभी राहिली. केंद्रप्रमुखांना आम्ही विनवणी करतो, असे कळवूनही परीक्षा केंद्रात सोडण्यात आले नाही. त्यामुळे मुजोर केंद्रप्रमुखाविरोधात परीक्षार्थिंनी संताप व्यक्त केला.
केपीएससी अंतर्गत पीपी डिक्लरेशनसाठी परीक्षा सुरू आहे. ही नोकरी मिळविण्यासाठी परीक्षा नसून पगारवाढ, बढती यासाठी महत्वाची असते. सकाळी 9.55 वाजता परीक्षा केंद्रात येऊनदेखील प्रवेश देण्यात आला नाही. पेंद्रप्रमुखांशी बोलण्याची परवानगीही मिळाली नाही. सव्वा दहा वाजता तुम्ही उशिराने आला आहात असे सांगून केंद्रप्रमुखांनी गैरहजर असा शिक्का मारल्याने आमचे मोठे नुकसान झाले असून याला सर्वस्वी केंद्रप्रमुख जबाबदार आहेत.
- कृपालिनी (परीक्षार्थी)
जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
परीक्षेसाठी आलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांनी घडलेल्या प्रकाराची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना फोनवरून दिली. ते सध्या बेंगळूर येथे असल्याने आपण बेळगावमध्ये येऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करू, असे त्यांनी आश्वासन दिले.