प्रशासनाचा गलथान कारभार; नागरिकांना मनस्ताप
पूर्वसूचना न देता पुन्हा कपिलेश्वर उड्डाणपूल बंद : नागरिकांचे हाल
बेळगाव : प्रशासनाच्या गलथान कारभाराचा फटका पुन्हा बेळगावच्या नागरिकांना बसला. नागरिकांना वेठीस धरून कोणतीही पूर्वसूचना न देता शुक्रवारी कपिलेश्वर उड्डाणपूल पुन्हा बंद करण्यात आला. कंत्राटदाराने पोलिसांकडून रस्ता बंद ठेवण्याची परवानगी घेतली. परंतु पोलिसांनी ही माहिती नागरिकांना न दिल्यामुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. यामुळे वळसा घालून धारवाड रोड उड्डाणपुलावरून प्रवास करण्याची वेळ आली. कपिलेश्वर उड्डाणपुलावरील रस्त्याची दुरवस्था झाल्याने डांबरीकरणाची मागणी होत होती. यासाठी महानगरपालिकेच्या प्रायव्हेट फंडातून 40 लाख रुपये मंजूर करण्यात आले. या निधीतून बुधवारी डांबरीकरणाचा एक थर करण्यात आला. यामुळे त्यादिवशी पूर्णपणे वाहतूक ठप्प होती.
नागरिकांना पूर्वसूचना न देताच अचानक रस्ता बंद करण्यात आला होता. यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. गुरुवारी रस्ता वाहतुकीसाठी सुरू होता. शुक्रवारी पुन्हा रस्ता बंद करण्यात आला. सकाळी कार्यालयात पोहोचणाऱ्यांना रस्ता बंद असल्याने वळसा घालून प्रवास करावा लागला. दिवसभर रस्ता बंद करण्यात आल्याने पर्यायी मार्गांवर प्रचंड गर्दी झाली होती. कंत्राटदाराने रस्ता करण्यापूर्वी पोलिसांची परवानगी घेतली होती. परंतु पोलिसांनी नागरिकांना वेळीच कळविले असते तर गैरसोय झाली नसती. त्यामुळे पोलीस प्रशासनाविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला. रात्री उशिरापर्यंत डांबरीकरणाचे काम सुरू होते. शुक्रवारी डांबरीकरणाचा दुसरा थर पसरविण्यात आला. यामुळे हा रस्ता आता गुळगुळीत झाला असून वाहतुकीसाठी शनिवारपासून खुला केला जाणार आहे. रस्ता करण्यास कोणाचाच विरोध नव्हता. परंतु प्रशासनाने पूर्वसूचना देणे गरजेचे होते, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.