For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दूधसागर पर्यटकांत दुजाभाव

11:06 AM Aug 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
दूधसागर पर्यटकांत दुजाभाव
Advertisement

सर्वांना बंदी पण काहीना संधी, फोटो व्हायरल

Advertisement

वार्ताहर/गुंजी

सरकारने दूधसागर येथे पर्यटनास बंदी घातली आहे. त्या ठिकाणी पर्यटकांना जाण्यास मज्जाव केला असला तरी या ठिकाणी काही पर्यटक आनंद लुटत असल्याचे सोशल मीडियावर फोटो व्हायरल होत आहेत. त्यामुळे इतर पर्यटकांतून या ठिकाणी दुजाभाव होत असल्याची भावना निर्माण होत असून नाराजी व्यक्त केली जात आहे. पावसाळ्dयात सर्रास अनेक धबधब्यांच्या ठिकाणी जाण्यासाठी सरकारने कठोर नियम लादून जोखमीच्या ठिकाणी पर्यटनास पूर्णपणे बंदी घातली असली तरी काही पर्यटक मात्र अशा बंदी घातलेल्या ठिकाणी पोहचतातच कसे, असा प्रश्न इतर पर्यटकांना पडत आहे. त्याचप्रमाणे दूधसागर या ठिकाणी सर्वांना बंदी असतानासुद्धा काही पर्यटक या ठिकाणी आनंद लुटताना दिसत आहेत. त्यामुळे ‘सर्वांना बंदी आणि काहीना संधी’ असा दुजाभाव अधिकारी करत असल्याचा आरोप होत आहे. वास्तविक मागील काही वर्षांपूर्वी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश अंगडी यांनी दूधसागर या ठिकाणी सर्व रेल्वे थांबण्याची व्यवस्था करून दूधसागर पर्यटनाला चालना देऊन पर्यटकांची खास व्यवस्था केली होती. मात्र त्यानंतर या ठिकाणी पर्यटकांची तोबा गर्दी आणि काही अप्रिय घटनांचे कारण पुढे करून त्या ठिकाणी पर्यटकांना पूर्णपणे बंदी लादण्यात आली.

Advertisement

दूधसागर पर्यटनास खुले करण्याची मागणी

अनेक पर्यटकांच्या मनात घर करून असलेले दूधसागर हे एक प्रसिद्ध निसर्गरम्य जल पर्यटनस्थळ असल्याने अनेकांना दूधसागर जवळून पाहण्याचा आणि तेथील निसर्गरम्य वातावरणात आनंद लुटण्याचा मानस आहे. त्यामुळे या स्थळावर पर्यटनासाठी सरकारने नियोजनबद्ध आराखडा तयार करण्याची गरज व्यक्त होत आहे. त्याकरिता वेबसाईटवर ऑनलाईन बुकिंग सेवा सुरू करून, पर्यटकांकडून किमान शुल्क आकारून दररोज सीमित पर्यटकांना क्रमश: प्रवेश दिल्यास याचा बऱ्याच पर्यटकांना लाभ होईल. असे अनेक पर्यटकांनी तरुण भारतकडे मनोगत व्यक्त केले आहे. तरी संबंधितांनी याची नोंद घेऊन नियमबद्ध पर्यटनास प्रारंभ करावा, अशी आग्रही मागणी होत आहे.

Advertisement
Tags :

.