ओडिशातील पोलीस ठाण्यात लष्करी अधिकाऱ्याशी गैरवर्तन
वाग्दत्त वधूचा लैंगिक छळ : पाच पोलीस निलंबित
वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
ओडिशातील भुवनेश्वरमधील भरतपूर पोलीस ठाण्यात एका लष्करी अधिकाऱ्यासोबत गैरवर्तन करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. तसेच त्याच्या वाग्दत्त वधूचा लैंगिक छळ झाल्याची घटना समोर आली आहे. पीडित महिला म्हणजेच वाग्दत्त वधू लष्करी अधिकाऱ्यासमवेत रोड रेजची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेली होती. याप्रसंगी पोलिसांनी सुरुवातीला त्यांच्याशी गैरवर्तन केले, नंतर लष्कराच्या अधिकाऱ्याला लॉकअपमध्ये डांबले. याला पीडितेने विरोध केला असता तिलाही मारहाण करून हात-पाय बांधण्यात आले. पीडितेच्या म्हणण्यानुसार, एका पुऊष अधिकाऱ्याने तिच्या छातीवर लाथ मारली. तसेच प्रभारी निरीक्षक पोलीस ठाण्यात पोहोचल्यावर त्यांनीही पीडितेशी गैरवर्तन केल्याचे सांगण्यात आले. याबाबत पोलिसांनीही खुलासा केला असून लष्करी अधिकारी आणि तिच्यासोबतची महिला पूर्णपणे मद्याच्या नशेत असल्याचे स्पष्ट केले आहे.
ही घटना 15 सप्टेंबरची असून पोलिसांनी पीडितेला गैरवर्तनाच्या आरोपाखाली अटक केली होती. 19 सप्टेंबरला उच्च न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतर त्यांच्यावर भुवनेश्वर एम्समध्ये उपचार करण्यात आले. त्यानंतर हे प्रकरण बाहेर आले आहे. पीडितेच्या आरोपानंतर डीजी वायबी खुरानिया यांच्या सूचनेनुसार गुऊवारी चांडका पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. त्यांनी गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिल्यानंतर भरतपूरच्या प्रभारी निरीक्षकासह 5 पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले.
दोघेही दारूच्या नशेत : पोलिसांचे स्पष्टीकरण
भरतपूर पोलिसांनी सांगितले की, लष्करी अधिकारी आणि त्याची वाग्दत्त वधू दारूच्या नशेत होती. 15 सप्टेंबर रोजी रात्री भरतपूर पोलीस ठाणे गाठून त्यांनी तोडफोड केली. संगणक व फर्निचरची मोडतोड झाली. तसेच कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्यांना मारहाण केली. त्यामुळेच त्यांना अटक करण्यात आली. महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली आहे. आयोगाने ओडिशाच्या डीजीपींना पत्र लिहून 3 दिवसांत कारवाईचा अहवाल मागितला आहे. तसेच याप्रकरणी तातडीने कार्यवाही करावी, असेही सांगितले.