For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कंग्राळी मैदानात मिर्झा इराणचा गुणांवर विजय

10:51 AM May 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
कंग्राळी मैदानात मिर्झा इराणचा गुणांवर विजय
Advertisement

हर्षवर्धन सदगीरकडून अमय बनिया हप्त्यावर पराभूत, रविकुमार, कार्तिक काटे, कामेश यांचे प्रेक्षणीय विजय

Advertisement

 त.भा.क्रीडा प्रतिनिधी, वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक

कंग्राळी बुद्रुक गावचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त श्री कलमेश्वर कुस्ती आखाडा, श्री कलमेश्वर कुस्तीगीर संघटना व ग्रामस्थांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानात इराणच्या मिर्झाने तब्बल 32 मिनिटानंतर भुपेंद्र अजनालावर दुहेरीपट काढून गुणावर विजय मिळविला. तर दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरने जम्मू केसरी अमय बनीयाला हप्ते डावावरती चीत करुन उपस्थित कुस्ती शौकिनांची मने जिंकली. आंतरराष्ट्रीय पदक विजेता मिर्झा इराण व पंजाब केसरी भुपेंद्र अजनाला ही कुस्ती कलमेश्वर कुस्ती संघटना, पंच नाशिर पटवेगार, जाकी सिद्दकी व शंकर पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली.

Advertisement

या कुस्तीत चौथ्या मिनिटाला मिर्झाने एकेरीपट काढून भुपेंद्रला खाली घेत घुटणा डावावरती फिरविण्याचा प्रयत्न केला. पण खालुन डंकी मारुन भुपेंद्रने सुटका करुन घेतली. 13 व्या मिनिटाला भुपेंद्रने पायाला टाच मारुन मिर्झाला खाली घेत घिस्सा मारण्याचा प्रयत्न केला. पण त्यातून मिर्झाने सुटका करुन घेतली. 22 व्या मिनिटाला मिर्झाने छडीटांग डावावरती खाली घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. पण बलदंड शरीराच्या भुपेंद्रला फिरविणे कठीण गेले. तब्बल 30 मिनिटानंतर पंच कृष्णा पाटील व शंकर पाटील यांनी कुस्ती गुणावर निकाली करण्याचा निर्णय घेतला. 32 व्या मिनिटाला मिर्झाने एकेरीपट काढून गुणासह विजय मिळविला. श्री कलमेश्वर मैदान मरगाईनगर वैकुंठधाम स्मशानभूमीच्या बाजुला भव्य आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान झाले.

डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर व जम्मू केसरी अमय बनिया यांच्यातील ही दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती विजय पावले, शंकर पाटील, जाकी सिद्दकी, उमेश चौगुले, राजू पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली. या कुस्तीत चौथ्या मिनिटाला हर्षवर्धन सदगीरने पायाला अकडी लावून अमयला खाली घेतले. खालुन कुंडी तोडून अमयने सुटका करुन घेतली. 12 व्या मिनिटाला हर्षधर्वनने छडीटांग डावावर फिरविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. पण अमयने हुशारीने सुटका करुन घेतली. 18 व्या मिनिटाला हर्षवर्धन सदगीरने छडीटांग मारुन अमय बनियाला खाली घेतले. पण खालुन डंकी मारुन बनियाने सुटका करत पुन्हा कब्जा मिळविण्याचा प्रयत्न करत असताना हर्षवर्धन सदगीरने हप्ते डावावरती चाडीमुंड्या चीत करुन आपली विजयी घोडदौड कायम राखली.

महाराष्ट्र चॅम्पियन रविराज चव्हाण, पुणे व हरियाणाचा रविंद्रकुमार ही तिसऱ्या क्रमांकाची लढत मनोज कडोलकर, मयुर बसरीकट्टी, देवाप्पा निंगन्नावर, नारायण काजुकर, संदेश राजमाने व दत्ता पाटील यांच्या हस्ते लावण्यात आली. सहाव्या मिनिटाला रवीने एकेरीपट काढून रविंद्रकुमारला खाली घेतले व एकलांगी भरुन फिरविण्याचा प्रयत्न केला. पण खालुन दशरंग फिरवून रविंद्रने सुटका करुन घेतली. 18 व्या मिनिटाला रविंद्रने एकेरीपट काढत रविराज चव्हाणला खाली घेतले व सवारी भरण्याचा प्रयत्न करत असताना रविराजने तोंडाला नाकपट्टी लावून नाकपट्टी डावावरती प्रेक्षणीय विजय मिळविला. डबल कर्नाटक केसरी कार्तिक काटे व महाराष्ट्र चॅम्पियन समीर देसाई पुणे यांच्यात झालेल्या चौथ्या क्रमांकाच्या लढतीत दुसऱ्याच मिनिटाला समीर देसाईने एकेरीपट काढून कार्तिक काटेला खाली घेत घिस्सा मारण्याचा प्रयत्न करत असताना खालुन डंकी मारुन डंकीवर चीत करण्याचा प्रयत्न केला. पण समीरचा दुसरा खांदा जमिनीला न टेकल्यामुळे पुन्हा कुस्ती खडाखडी सुरू करण्यात आली. सहाव्या मिनिटाला समीरने दुहेरीपट काढून कार्तिकला एकलांगी भरत असताना खालुन डंकी मारुन डंकी डावावरती समीरला चारीमुंड्या चीत करत उपस्थित कुस्ती शौकिनांकडून वाहवा मिळविली.

कर्नाटक कंठीरवा केसरी कामेश कंग्राळी खुर्द व पृथ्वीराज पाटील पुणे यांच्यातील पाचव्या क्रमांकाच्या लढतीत 13 व्या मिनिटाला कामेशने दुहेरीपट काढून पृथ्वीराज पाटीलला खाली घेवून मानेवरती मजबूत घुटणा ठेवून घुटणा डावारती चीत केले. सहाव्या क्रमांकची कर्नाटक केसरी प्रकाश पाटील इंगळगी व बसवराज पाटील जमखंडी यांच्यातील लढत डावप्रतिडावाने झुंजली. वेळेअभावी पंचांनी ही लढत गुणावर सोडविण्याचा निर्णय घेतला. यामध्ये  प्रकाशने गुणावर विजय मिळविला. सातव्या व आठव्या क्रमांकाच्या कर्नाटक चॅम्पियन प्रेम जाधव कंग्राळी व उदयराज ता. मोतीबाग तसेच पार्थ पाटील कंग्राळी व सुरज पाटील मोतीबाग-कोल्हापूर यांच्यातील लढती बरोबरीत सोडविण्यात आल्या. नवव्या क्रमांकाच्या लढतीत मंजुनाथ दुसक्की हल्ल्याळ मैदानात उपस्थित न राहिल्याने कर्नाटक चॅम्पियन प्रथमेश हट्टीकर कंग्राळीला विजय घोषित करण्यात आले. निखिल पाटील कंग्राळी व विनायक वस्कर मोतीबाग-कोल्हापूर यांच्यातील दहाव्या क्रमांकाची लढत बरोबरीत सोडविण्यात आली.

याशिवाय भूमीपुत्र मुतगा, कार्तिक इंगळगी, अजित कंग्राळी, विकास स्पोर्ट्स हॉस्टेल, साई नाईक, श्रेयश पाटील, नचिकेत पावशे, प्रणव उचगाव, सचिन घोडगेरी, प्रज्वल चिमड, शरीफ शेख, गजानन जमखंडी, सिद्धार्थ कंग्राळी, सचिन डाव, मंथन सांबरा, वंश जुनेबेळगाव, बालाजी कंग्राळी, संदीप घोडकेरी, अक्षय, सिद्धार्थ कक्केरी, वेदांत मासेकर आदी मल्लांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करुन विजय मिळविला.   विष्णूकुमार जोशिलकर, कृष्णा पाटील, शंकर पाटील, बाळाराम पाटील, विश्वनाथ पाटील, शिवाजी पाटील, गणपत बनोशी, नवीन मुतगे, निखिल पाटील, प्रशांत पाटील आदींनी काम पाहिले तर कुस्तीचे समालोचन कृष्णकांत चौगुले-राशिवडे यांनी केले. तर कुरुंदवाडचे माजी नगरसेवक राजू आवळे यांनी आपल्या रणालगीच्या तालावर सर्व कुस्ती शौकिनांना खिळवून ठेवले.

गदेचे मानकरी

श्री कलमेश्वर केसरी किताब व गदासाठीच्या लढतीत सुशांत पाटील-बी.के.कंग्राळीने राहुल नंदगडला घिस्सा डावावरती तर तन्मय पाटीलने आपल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करुन गदेचे बक्षीस मिळविले. आकर्षण लढतीत श्रीराज पाटील, अनुज पाटील, तन्मय पाटील, ध्रुव मण्णिकेरी हे विजयी झाले.

Advertisement
Tags :

.