मिरकरवाडा बंदराने घेतला मोकळा श्वास
रत्नागिरी :
मिरकरवाडा बंदर प्राधिकरणाच्या सुमारे २५ एकर जागेत अतिक्रमणे बोकाळली होती. या क्षेत्रात जागा मिळेल तिथे अनधिकृत बांधकामे करण्यात आल्याने बंदराला बकाल स्वरुप प्राप्त झाले होते. हे बंदर विकसित केले जात असताना या अतिक्रमणांचा मोठा अडसर निर्माण झालेला होता. ही बाब लक्षात घेऊन मंत्री नीतेश राणे यांनी येथील अतिक्रमणांविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर मत्स्य व्यवसाय विभागाने बांधकामे करणाऱ्या संबंधित मच्छीमार व इतर छोट्या मोठ्या व्यावसायिकांना नोटीसा दिल्या होत्या. रविवारपर्यंत काही मच्छीमारांनी अतिक्रमणे स्वतःच काढली होती.
कारवाईमुळे मासेविक्री दोन दिवस बंद
यावेळी मत्स्य व्यवसायचे सहाय्यक संचालक व्ही. एम. भादुले, सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त आनंद पालव, बंदर अधिकारी, बंदर निरीक्षक जीवन सावंत आणि मत्स्य व्यवसाय विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. स्वतः पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, डीवायएसपी नीलेश माईणकर यांच्यासह २ उपविभागीय पोलीस अधिकारी, ५ पोलीस निरीक्षक, १५ पोलीस उपनिरीक्षक, १५३ पोलीस अंमलदार, प्रत्येकी ३० पोलिसांचा समावेश असलेल्या अशा ३ आरसीपी प्लाटून तसेच सागर सुरक्षा रक्षक दलाचे जवानही तैनात होते. त्यामुळे दुपारपर्यंत ही कारवाई शांततेत पार पडली. या कारवाईमुळे येथील मासे विक्री दोन दिवस बंद ठेवण्यात आली आहे.