मिरजेच्या तबलावादकाने ‘सवाई’त आणली रंगत
सांगली :
सत्तराव्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाचा प्रारंभ बुधवारी दुपारी एस. बल्लेश व डॉ. कृष्णा बल्लेश यांच्या शहनाई वादनाने झाला. या पहिल्याच कार्यक्रमाला मिरजेचे युवा तबलावादक प्रसाद लोहार यांनी बहारदार साथसंगत करीत कार्यक्रमात रंगत आणली. काहीवेळ शहनाई आणि तबल्याची रंगलेली जुगलबंदी रसिकांची दाद मिळवून गेली. सवाई गंधर्व संगीत महोत्सवासारख्या अखिल भारतीय कीर्तीच्या संगीत महोत्सवात पहिल्यांदाच मिरजेच्या एखाद्या कलाकाराला संधी मिळाली. ‘संगीतपंढरी’ म्हणून नावाजलेल्या मिरजेतील नव्या पिढीतील कलाकाराला बहुमान मिळाल्याने या नगरीच्या लौकिकात भर पडली आहे.
पुणे येथे आर्य संगीत प्रसारक मंडळाच्यावतीने दरवर्षी किराणा घराण्याचे ख्यातनाम गायक स्व. सवाई गंधर्व यांच्या स्मृतीप्रित्यर्थ्य अखिल भारतीय स्वरूपाचा संगीत महोत्सव साजरा केला जातो. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी हा महोत्सव सुरू केला. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळविलेले गायक-वादक या महोत्सवात हजेरी लावतात. या महोत्सवात कला सादर करायला मिळणे, हे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. संगीत क्षेत्रात ‘तयार’ असलेल्या कलाकारालाच येथे संधी मिळते. भीमसेन जोशी यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र श्रीनिवास जोशी यांच्या नेतृत्त्वाखाली हा महोत्सव सुरू आहे.
बुधवारी दुपारी 70 व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाला रसिकांनी उदंड प्रतिसादात प्रारंभ झाला. पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमाचा आरंभ चेन्नईच्या एस. बल्लेश आणि डॉ. कृष्णा बल्लेश यांच्या सुरेल शहनाई वादनाने झाला. बल्लेश पिता-पुत्रांच्या शहनाईला समर्पक अशी साथ लाभली ती मिरजेचे युवा तबलावादक प्रसाद लोहार यांची. प्रसाद लोहार यांच्या तबलासाथीने बल्लेश पिता-पुत्रांचा कार्यक्रम रंगत गेला. त्यांनी ‘मधुवंती’ रागात वादन करीत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमात बल्लेश पिता-पुत्रांची प्रसाद लोहार यांच्याबरोबर शहनाई आणि तबल्याची झालेली छोटी जुगलबंदी रसिकांची दाद देऊन गेली.
सवाई गंधर्व संगीत महोत्सवासारख्या अखिल भारतीय कीर्तीच्या संगीत महोत्सवात प्रसाद लोहार या मिरजेच्या युवा कलाकाराला आपली कला सादर करण्याची मोठी संधी मिळाली. प्रसाद लोहार यांनी तबलावादनाचे प्राथमिक धडे हे सुकुमार लोहार यांच्याकडून घेतले. तर सध्या ते मिरजेतील जितेंद्र भोसले यांच्याकडे गेली 12 वर्षे तबला वादनाचे धडे घेत आहेत. राज्यातील अनेक महत्त्वाच्या संगीत महोत्सवात त्यांनी ख्यातनाम सतारवादक उस्ताद शाहीद परवेझ, उस्ताद शाकीर खान, पंडित शैलेश भावगत यांच्यासह अनेक नामवंत कलाकारांना साथ केली आहे.
सवाईच्या संगीत महोत्सवात कला सादर करणे हे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. आयुष्यातला तो एक बहुमान असतो. मिरजेच्या प्रसाद लोहार यांना हा बहुमान आज 70 व्या संगीत महोत्सवाच्या उद्घाटन सत्रातच मिळाला. लोहार यांच्या या बहुमानामुळे ‘संगीतपंढरी’ मिरजच्या नावलौकिकातही भर पडली आहे.