शिंदे कारखान्याकडे जाणारे उसाचे ट्रॅक्टर पेटवले; मिरज पूर्व भागात ऊसदर आंदोलन चिघळले
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्रात ऊसदर जाहीर करण्याच्या मागणीसाठी कारखाना बंद आंदोलन सुरू आहे. मिरज तालुक्यातही गेल्या पाच दिवसांपासून विविध साखर कारखान्यांसमोर आंदोलने सुरू आहेत. मोहनराव शिंदे कारखान्याबाबतही आंदोलकांनी गुरुवार आणि शुक्रवारी ऊस वजनकाटा बंद आंदोलन करून प्रशासनाशी चर्चा केली होती.
शनिवारपासून कारखाना बंद ठेवण्याची हमी दिल्यानंतरही कारखाना सुरू ठेवण्याची भूमिका प्रशासनाने घेतल्याचा आरोप आंदोलकांकडून केला जात आहे. यामुळे शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढल्याची चर्चा आहे.
दरम्यान, रविवारी मध्यरात्री कारखान्याकडे ऊस घेऊन जाणारे ट्रॅक्टर लक्ष्मीवाडी आणि मल्लेवाडी-आरग रस्त्यावरून जात असताना त्यांना आग लावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ऊसासह ट्रॅक्टर जळाल्याने नुकसान झाले आहे. मात्र, या घटनेमागील नेमकी कारणे आणि जबाबदार व्यक्तींबाबत अधिकृत माहिती स्पष्ट झालेली नाही.
ऊसदर जाहीर करण्याची मागणी तीव्र
मिरज पूर्व भागातील शेतकऱ्यांना ऊसाचा दर तातडीने जाहीर करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात येत आहे. सलगरे, भोसे, आरग, मालगाव, बेडग, सिद्धेवाडी, मल्लेवाडी आणि एरंडोली या गावांमध्ये आंदोलनाची तीव्रता वाढल्याचे चित्र आहे.
ऊसदराच्या प्रश्नावर कारखाना प्रशासन आणि शेतकरी संघटनेतील संघर्ष वाढत असताना ट्रॅक्टर जाळण्याच्या घटनेमुळे परिस्थिती अधिक तणावपूर्ण झाली आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच चर्चेतून ऊसदराचा प्रश्न सोडवावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
