मिरजेचा शिवपुतळा 52 वर्षानंतरही अभेद्य! घरोघरी तांब्या-पितळेची भांडी गोळा करुन उभारला 1900 किलोचा पुतळा
चित्रपस्वी भालजी पेंढारकरांची देखरेख, निधीसाठी लोकांनी काढला होता मोर्चा
प्रशांत नाईक/मिरज
शहरातील मंगळवार पेठ येथे शिवतिर्थावर 1972 साली उभारलेला शिव छत्रपतींचा पुर्णाकृती पुतळा 52 वर्षानंतरही अभेद्य स्थितीत आहे. हा पुतळा उभारण्यासाठी शिवप्रेमींनी अनेक संघर्ष केला. घरोघरी तांब्या-पितळेची भांडी गोळा करुन तसेच लोकवगर्णीतून तब्बल 1900 किलोच्या ब्रांझ धातुच्या पुतळ्यास आकार दिला. चित्रपतस्वी भालजी पेंढारकर यांची देखरेख आणि प्रसिध्द मुर्तीकार दादा ओतारी यांची हस्तकला यातून साकारलेला पुतळा उत्कृष्ठ मुर्ती कलेचा नमुना म्हणावा लागेल. मालवण येथील शिवछत्रपतींचा पुतळा ढासळल्यानंतर मिरजेतील शिवछत्रपतींच्या अभेद्य पुतळ्याच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत.
मालवण येथील राजकोट परिसरात नव्याने उभारलेला शिवछत्रपतींचा पुतळा केवळ आठ महिन्यांत ढासळला. या घटनेमुळे राज्यभरातील शिवप्रेमी गहिवरले आहेत. पुतळा कामात अनेक चुका झाल्याचे निदर्शनास येत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे सुमारे पाच कोटी रुपये खर्चून उभारलेला पुतळा ढासळला कसा? असा सवाल आहे. 52 वर्षांपूर्वी कोणत्याही आधुनिक यंत्र साधनसामुग्रीचा वापर न करता मिरजेतील छत्रपतींचा पुतळा कसा उभारला असेल? असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात प्रकट झाला आहे.
‘कात्री गल्ली’ अशा नामकरणाने कुप्रसिध्द असलेला मंगळवार पेठेचा तत्कालीन परिसर. 1972 साली याच भागातील रहिवाशी असलेल्या शरद अवसरे यांनी आपल्या गल्लीत छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा बसवावा, अशी मनिषा व्यक्त केली. सांगलीचे रहिवाशी असलेल्या भाई ताराचंद शहा यांनी या संकल्पनेला बळ देऊन अर्धाकृती ऐवजी पुर्णाकृती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारुया, असे सांगितले. त्यानंतर नारायण बोंगाळे यांच्या अध्यक्षतेखाली शिवस्मारक समिती स्थापन केली. शरद अवसरे, भाई ताराचंद शहा, नारायण बोंगाळे, विश्वनाथ पिसे, विठल माळवदे, वसंत गवंडी आदी शिवप्रेमींनी एकत्र येत शिवछत्रपतींचा पुतळा बसविण्यासाठी निधी संकलनाची मोहिम सुरू केली.
शिव स्मारक समितीच्या या संकल्पनेला माजी आमदार स्व. मोहनराव शिंदे, बॅ. जी. डी. पाटील यांनीही साथ दिली. किसान चौकात जाहीर सभा घेऊन लोकांना ही संकल्पना सांगितली. शिव स्मारक समितीच्या माध्यमातून नगरपालिकेकडे दहा हजार रुपयांच्या निधीची मागणी केली. माजी नगराध्यक्ष दस्तगीर बारगीर यांनी निधी देण्याचे आश्वासन दिले. पण हातात दहा हजार रक्कमेऐवजी पाच हजारच मिळाल्याने शिवप्रेमी नागरिकांनी तत्कालीन नगरपालिकेवर मोर्चा काढला.
शासन, प्रशासनाकडे निधीची अपेक्षा करुन पुतळा उभारण्याचे कार्य सिध्दीस जाणार नाही, याची जाणीव झाल्याने अखेर शिवप्रेमींनी लोकवगर्णीतून व स्वखर्चाने पुतळा उभारण्याचा निर्धार केला. सुरूवातीला समितीच्याच हाती भांडवल नसल्याने घरोघरी वर्गणी मागण्यात आली. लोकांनीही जमेल ती मदत केली. भाजीपाला विक्रेते, रिक्षा चालकांपासून एमआयडीसीत काम करणाऱया मजूरांनीही चार आणे व आठ आणे अशी परिस्थितीप्रमाणे वगर्णी दिली. घरोघरी जावून तांबा, पितळ, लोखंड, ऍल्यूमिनियमच्या भांडी संकलीत केल्या. यातून सुमारे 1900 किलो वजनाचे विविध धातू संकलीत झाले. याशिवाय संकलीत झालेल्या रोख रक्कमेतून सुमारे 20 तोळे सोनेही खरेदी केले. या सोन्याचा वापर केवळ शिवाजी महाराजांच्या चेहऱयासाठी करायचं ठरलं.
मुर्तीचे रुप कसे असावे? याची जबाबदारी चित्रपट निर्माते, चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांच्याकडे होती. भव्य दिव्य, करारी स्वरुपी शिवमुर्ती साकारण्यासाठी भालजी पेंढारकर यांनी कारागिरांना वेगवेगळ्या सुचना केल्या. प्रसिध्द मुर्तीकार दादा ओतारी यांच्याकडे मुर्ती घडविण्याची जबाबदारी दिली. सुमारे दोन वर्षे मुर्ती घडविण्याचे काम सुरू होते. ओतारी यांच्याकडे मनुष्यबळ व साधने कमी असल्याने उद्योजक गोविंदराव मराठे यांनी आपल्या कारखान्यातील ग्रँडर, वेल्डर आदी मशिनरीसह कामगारही उपलब्ध करुन दिले. तसेच समितीचे कार्यकर्ते, एमआयडीसीतील मजूर, भाजीपाला विक्रेते यांनीही मुर्ती घडविण्यासाठी ओतारी यांच्या हाताखाली मदतीसाठी काम केले. दोन वर्षांच्या परिश्रमानंतर छत्रपतींचा पुतळा पूर्णत्वास आला. अन् 15 मे 1972 साली तो स्थापन झाला. आज याच पुतळ्याला 52 वर्षे पूर्ण झाली आहेत. शासनाने पाच कोटी रुपये खर्चून मालवण येथे पुतळा उभारला. पण तो आठ महिन्यात कोसळला. मिरजेचा पुतळा मात्र आधुनिक तंत्रज्ञानालाही झुकायला लावून ताठ मानेने भक्कमपणे उभा आहे.
पेंढारकरांनी तीनवेळा बदलला मुर्तीचा चेहरा
भालजी पेंढारकर आणि दादा ओतारी यांनी खऱया शिवमुर्तीत जीव ओतण्याचा प्रयत्न केला. शिवरायांचे हास्य वदन, करारी बाणा, भव्य अश्व आणि लढण्याच्या मोहिमेवर जाणारे शिवराय मुर्तीतून साकार केले जाणार होते. पेंढारकर यांनी विशेष करुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱयावर लक्ष केंद्रीत केले होते. पेंढारकरांच्या मनासारखा चेहरा होण्यासाठी त्यांनी तीनवेळा करागिराकरवी पुतळ्याचा चेहरा बदलावयास सांगितला होता. विशेष म्हणजे या पुतळ्यात फक्त शिवरायांच्या चेहऱयामध्ये 20 तोळे सोन्याचा वापर केला असल्याचे शिवप्रेमी सुधीर अवसरे सांगतात.
प्रतिक्रिया
शिवभक्तांच्या प्रेमाचे प्रतिक
मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शिवभक्तांच्या प्रेमाचे प्रतिक आहे. अनेक निस्सीम शिवभक्तांनी या मुर्तीसाठी स्वतला झोकून देऊन काम केले. कोणत्याही शासकीय निधीविना साकारलेला हा पुतळा आजही भक्कम आहे. मालवणमधील पुतळा कोसण्याची घटना वेदनादायी आहे. शिवप्रेमींच्या अस्मितेला ठेच पोहचली आहे. सदर कामाची चौकशी करुन दोषींवर कारवाई झाली पाहीजे
सुधीर अवसरे शिवप्रेमी