मिरजेत अधिकाऱ्याला एक कोटी, 37 लाखांचा गंडा
मिरज :
ऑनलाईनद्वारे मोबाईल क्रमांक चोरुन व्हॉटस्अॅप व व्हिडीओ कॉलद्वारे एलआयसी अधिकाऱ्याला ब्लॅकमेल करुन सुमारे एक कोटी, 37 लाख, 379 रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एलआयसीचे विकास अधिकारी किरण दिनकर पवार (वय 51, रा. रमा उद्यान, पंढरपूर रोड, प्लॉट नं. 71, मिरज) यांनी मिरज शहर पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार संशयित दिपक वाधवा आणि कोमला वाधवा उर्फ कोमलदेवी दो ममराज अशा अनोळखी संशयितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
किरण पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, वरील संशयित दोघांनी ऑनलाईन इंटरनेटद्वारे पवार यांचा मोबाईल क्रमांक मिळविला. त्यानंतर वारंवार व्हॉटस्अॅप कॉल केला. सुरूवातीला रविता सोनी बोलतोय, असे भासवून पवार यांना खेळविले. त्यानंतर ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली. वेगवेगळी अमिषे व भिती दाखवून पवार यांच्याकडे असलेल्या मोबाईल क्रमांकावऊन तसेच त्याला संलग्न असलेल्या बँक खात्यावऊन ऑनलाईन स्वरुपात एक कोटी, 37 लाख, 379 रुपये उकळले.
नऊ महिन्यानंतर हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार लक्षात आल्यानंतर गुरूवारी किरण पवार यांनी शहर पोलिसात धांव घेतली. तेथे पोलिसांना घडलेला वृत्तांत सांगून फसवणुकीची तक्रार दिली. पोलिसांनी फसवणुकीबाबत दिपक वाधवा आणि कोमला वाधवा उर्फ कोमलदेवी दो ममराज अशा अनोळखी संशयितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत शहर पोलिस अधिक तपास करीत आहेत.
दरम्यान, ऑनलाईन फसवणुकीचा प्रकार पुन्हा एकदा सुरू झाल्याचे या घटनेवऊन स्पष्ट होते. काही दिवसांपासून ऑनलाईन अरेस्ट, फिशर स्कॅमर आदी फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. सोशल मिडीयावर सर्फींग करीत असताना काहीजण अनोळखी लिंक उघडतात. त्यातून फसवणूक करणाऱ्या ठग्यांच्या हाती आपला मोबाईल क्रमांक लागतो. त्यानंतर फसवणुकीचा सिलसिला सुरू होऊन अनेकजण भितीपोटी पैसे देतात. त्यामुळे अशा फसवणूक प्रकारापासून नागरिकांनी सावध रहावे. असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे. एलआयसीसारख्या नामवंत इन्शुरन्स कंपनीत अधिकारी पदावर काम करणाऱ्या व्यक्तीलाच कोट्यावधीचा गंडा बसल्याने खळबळ उडाली आहे.