Miraj Eid 2026 | मिरजेची बाजारपेठ ईदच्या उत्साहात न्हाली! खरेदीसाठी मुस्लिम बांधवांची बाजारपेठेत अलोट गर्दी
मिरज शहरात रमजान ईदपूर्वी बाजारपेठ सजली; खरेदीला गर्दी
मिरज -दोन दिवसांवर आलेल्या रमजान ईद सणानिमित्त शहरातील बाजार पेठ फुलली असून, खरेदीचा उत्साहात बाढला आहे. आखाती युध्दामुळे सोन्या-चांदीचा दर कमी झाल्याने तयार दागिन्यांच्या खरेदीसाठी ग्राहकांची लगबग सुरू आहे. रमजाननिमित्त इदगाह समितीच्यावतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. ईदनिमित्त प्रमुख बाजार पेठेत कपडे आणि अन्य साहित्याचे स्टॉल्स सजले असून, खरेदीसाठी दिवसभर मुस्लिम बांधवांची गर्दी होत आहे.
गेली महिनाभर मुस्लिम बांधव रमजान महिन्याचे रोजे (उपवास) करीत आहेत. दिवसभर अन्नपाणी न घेता हा उपवास लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वजण करीत आहेत. यानिमित्ताने महिनाभर विविध प्रकारची धार्मिक कार्ये, दानधर्म करण्यात येत होते. आता प्रतिक्षा आहे ती, अमावस्येसनंतर येणाऱ्या चंद्रदर्शनाची. शुक्रवारी २० रोजी चंद्रदर्शन झाले तर, शनिवारी २१ रोजी इद साजरी होईल. त्यासाठी मुस्लिम बांधवांमध्ये उत्साह आहे.
आठवडाभर ईदसाठी शहरातील बाजारपेठ सज्ज आहे. विविध प्रकारचे कपडे, इलेक्ट्रानिक वस्तू, गृहोपयोगी साहित्य, सौंदर्यप्रसाधने यांची दुकाने मुस्लीम बांधवांनी फुलून गेली आहेत. उंची अत्तरेही विकण्यास आली आहेत. ईदसाठी तयार होणाऱ्या शिरखुर्त्यांसाठी सुकामेवा, शेवया व अन्य साहित्य खरेदी करण्यासाठी लक्ष्मी मार्केट, तांदूळ मार्केट, लोणी बाजार या भागात गर्दी होत आहे. शिरखुर्यासाठी दूध खरेदीसाठी गुरूवार पेठेतील देवल डेअरी, ब्राम्हणपुरीतील विटा डेअरीसह अन्य दुग्धालयांमध्ये मुस्लिम बांधवांनी नोंदणी केली आहे. दुधाची टंचाई भासू नये, म्हणून १५ दिवसांपूर्वीच अनेक मुस्लिम बांधवांनी दुग्धालयामध्ये नोंदणी करून ठेवली आहे.
ईदचे मुख्य नमाज पठण शहराबाहेरील निमजगा माळावरील ऐतिहासिक इदगाह मैदानावर होते. याठिकाणी १५ हजाराहून अधिक लोक एकावेळी नमाजपठण करू शकतात. या मैदानाची स्वच्छता करण्यात आली असून, इदगाहच्या वास्तूची रंगरंगोटी करण्यात आली आहे. दरम्यान, ईदनिमित्त शहरात पोलीस बंदोबस्त आहे.