मिरज शासकीय रुग्णालयातील बांधकामाचा स्लॅब कोसळला; 7 कामगार जखमी, दोघे गंभीर
मिरज / प्रतिनिधी : मिरज शासकीय रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ उभारण्यात येत असलेल्या स्वागत कमानीचा निर्माणाधीन स्लॅब अचानक कोसळल्याने सात कामगार जखमी झाले. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. सोमवारी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे रुग्णालय परिसरात काही काळ खळबळ उडाली.
मिरज शासकीय रुग्णालयाच्या नूतनीकरणाचे काम सध्या सुरू आहे. मुख्य प्रवेशद्वाराजवळ स्वागत कमान उभारण्याचे काम सुरू असून त्यासाठी नुकताच स्लॅब टाकण्यात आला होता. मात्र, दुपारी अचानक हा स्लॅब ढासळला. त्यावेळी कामगार कामावर असल्याने सात जण ढिगाऱ्याखाली अडकले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, रुग्णालयातील कर्मचारी आणि पोलिसांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. अथक प्रयत्नांनंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सर्व कामगारांना बाहेर काढण्यात आले. जखमींना तातडीने मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अजित कोकाटे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच जखमी कामगारांची विचारपूस केली.
दरम्यान, नुकताच बांधण्यात आलेला स्लॅब कोसळल्याने या बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. शासकीय रुग्णालयाच्या नूतनीकरणाच्या कामात निकृष्ट साहित्य वापरले जात असल्याचा आरोप काही नागरिकांकडून करण्यात येत आहे. या घटनेची सखोल चौकशी करून बांधकामाची गुणवत्ता तपासावी तसेच दोषी आढळल्यास संबंधित ठेकेदार आणि विभागावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
अरविंद कुमार, कादर शेख, शाहिद शेख, अनिस रहेमान मलिक, मिनारूल शेख, अकिबुल शेख आणि सियाराम चौधरी हे जखमी कामगार आहेत.