Miraj Murder Case: मिरजेत खूनी हल्ल्यामागे काझी टोळीचाच हात
12:44 PM Jun 04, 2026 IST | NEETA POTDAR
Advertisement
टोळीचा म्होरक्या मतिन काझीसह सहा जणांवर गुन्हा : जखमीची प्रकृती चिंताजनक
Advertisement
मिरज : येथील टाकळी रस्त्यावर शिव उर्फ प्रदीप सदाशिव अथणीकर या तरुणावर खूनी हल्ला झाल्याच्या प्रकरणात शहरातील काझी टोळीचा सहभाग पोलिस तपासातून निष्पन्न झाला आहे. शहर पोलिसांनी टोळी प्रमुख मतिन काझीसह चौघांची नावे निष्पन्न केली असून, दोन अनोळखींसह सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. काझी टोळीने गुन्ह्यात वापरलेली चारचाकी पोलिसांनी जप्त केली आहे.
खूनी हल्ल्यानंतर सर्व संशयित परागंदा झाले असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, हल्ल्यातील जखमी शिव अथणीकर याच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मंगळवारी रात्री उशिराने त्याच्यावर पोटाची शस्त्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र, डोक्यात खोलवर जखमा असल्याने शिव याची प्रकृती दुसऱ्या दिवशीही चिंताजनक होती. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.
मंगळवारी दुपारी मिरज-टाकळी रस्त्यावर चांद मशिदीजवळ शिव अथणीकर दुचाकीवरून जात असताना त्याच्यावर प्राणघातक हल्ला झाला. हल्लेखोरांनी चारचाकीतून येऊन शिव याला धडक देत दुचाकीसह उडविले. त्यानंतर कोयता व तलवारीने पोटात आणि डोक्यात तब्बल १३ वार केले आहेत.
या हल्ल्यानंतर संशयितांनी गुन्ह्यात वापरलेल्या चारचाकीची नंबर प्लेट व काही हत्यारे घटनास्थळी टाकून पळ काढला. काही प्रत्यक्षदर्शी व घटनास्थळी सापडलेल्या वस्तूंच्या आधारे तपासाला गती दिली आहे. शहर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांची वेगवेगळी पथके रवाना करण्यात आली आहेत.
हॉटेल रस्सा प्रकरणावरूनच हल्ला
काही महिन्यांपूर्वी कॅसिनो व व्याजाने घेतलेल्या पैशाच्या कारणातून काझी व शेख टोळीमध्ये वाद झाला होता. त्यानंतर शेख टोळीने टाकळी रस्त्यावर रस्सा हॉटेलची तोडफोड केली होती. काझी टोळीचा प्रमुख मतिन काझी याने हॉटेल चालकाच्या बाजूने भांडणात मध्यस्थी केली होती. त्यावेळी शेख टोळीचा सदस्य असलेल्या शिव अथणीकर याने मतिन काझीवर कोयत्याने हल्ला केला होता. तेव्हापासून काझी टोळी शिव अथणीकर याच्यावर टपून होती. याच भांडणाच्या कारणातून काझी टोळीने मंगळवारी टाकळी रस्त्यावर दबा धरून शिव याचा गेम वाजविण्याचे ठरविले.