विशाल समर्थकांकडून जिल्हा ‘काँग्रेस’ कमिटीवरील काँग्रेस शब्दालाच चुना!
महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे तिकिट कापल्याने केले कृत्य : मिरज काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी बरखास्त केली काँग्रेस : विशाल पाटील अपक्ष उभे राहणार का : उलटसुलट चर्चेला उधाण सुरू
सांगली प्रतिनिधी
महाविकास आघाडीतून सांगली लोकसभेची जागा शिवसेना उध्दव ठाकरे गटाला मिळाली आहे. त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते चिडून आहेत. त्यातच काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील समर्थकांनी हा राग काँग्रेस कमिटीवर असणाऱ्या काँग्रेस शब्दालाच पांढरा रंग लावून याचा निषेध केला आहे. तर मिरज काँग्रेस कमिटीची बैठक झाली यात मिरज काँग्रेस कमिटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देवून मिरज काँग्रेसच बरखास्त केली. त्यामुळे आता काँग्रेस कार्यकर्तेच काँग्रेसच्या विरोधात घोषणाबाजी करू लागले आहेत.
सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघावर 17 पैकी 16 वेळा काँग्रेसचा खासदार निवडून आला आहे. त्यामुळे हा मतदारसंघ पारंपारिक काँग्रेसचाच असताना जाणूनबुजून हा मतदारसंघ महाविकास आघाडीतील एक घटक पक्ष असणाऱ्या शिवसेना उध्दव ठाकरे गटाला काही अदृश्य शक्तीने दिल्याचा आरोप करत विशाल पाटील समर्थक शिपुरचे रणजीत देसाई यांनी सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीवरील काँग्रेस या शब्दाला हा पांढरा रंग लावला आहे. हा रंग लावल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, विशाल पाटील यांची प्रबळ उमेदवारी असतानाही काही अदृश्य शक्तीनी जाणूनबुजून त्यांचे तिकिट काटण्यासाठी प्रयत्न केला आहे. त्या प्रयत्नातूनच शिवसेनेचे जिल्ह्यात कोणीही जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक नसतानाही ही जागा त्यांच्या गळ्यात मारण्यात आली आहे.
सहा महिन्यापूर्वीच विशाल पाटील यांची उमेदवारी जाहीर....
सांगलीवर फक्त आणि फक्त काँग्रेसचाच दावा होता. सहा महिन्यापुर्वीच प्रदेश कार्यकारिणीमध्ये सांगलीच्या जागेवर प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील हे लढणार असे जाहीर करण्यात आले होते असे असतानाही सांगलीची जागा अंतिम क्षणी शिवसेनेकडे देण्याचे कारण काय. तसेच ही जागा कोणामुळे शिवसेनेला गेली आहे याचाही उलगडा होण्याची गरज आहे. सांगलीची जागा काँग्रेस पक्षाची होती आणि ती पक्षाचीच राहणार आहे. आता जर काँग्रेसला ही जागा मिळाली नाही तर काँग्रेसच कशाला असा सवाल त्यांनी केला. सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीने आता यापुढील काळात याचा विचार करावा आणि कार्यकर्त्याच्या भावना लक्षात घेवून निर्णय घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.
मिरज काँग्रेस कमिटीच बरखास्त
सांगली लोकसभेला जर काँग्रेसचाच हक्काचा उमेदवार नसेल तर काँग्रेस पदाधिकारी असून काय उपयोग असे म्हणत मिरज काँग्रेस कमिटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि सर्व सेलप्रमुखांनी आता राजिनामे दिले आहेत. तसेच मिरज काँग्रेस कमिटी बरखास्त करण्यात आल्याची घोषणाही केली आहे. मिरज काँग्रेस पदाधिकाऱ्यांची सांगलीत बैठक झाल्यानंतर हा निर्णय करण्यात आला आहे.
काँग्रेस प्रदेश अध्यक्षांना काळे झेंडे दाखवणार
महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी जर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आले तर त्यांना काळे झेंड दाखवण्याचा इशाराही यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यानी दिला आहे. काँग्रेस कार्यकर्ते विशाल पाटील यांचे तिकिट कापल्याने संतप्त झाले आहेत. त्यातून त्यांनी प्रदेश कार्यकारिणी पदाधिकारी आणि महाविकास आघाडीच्या बैठकीत असणाऱ्या नेत्यांच्या नावानेही खडे फोडले आहेत. त्यामुळे आता सांगली जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या घटक पक्षातच वादंग सुरू झाले आहे.