मीराबाग आंदोलनाचे शिमगोत्सवात पडसाद
पारंपरिक शिमगा खेळण्यासाठी येणाऱ्या गड्यांच्या जेवणाची आंदोलनस्थळी सोय, परंपरा होऊ दिली नाही खंडित
कुडचडे : सावर्डे मतदारसंघातील मीराबाग येथे प्रस्तावित बंधाऱ्याच्या विरोधात गाव वाचविण्यासाठी गावातील लोक धरणे आंदोलनावर बसल्यामुळे यंदा वर्ष परंपरेप्रमाणे काकोडा गावातून मीराबाग येथे पारंपरिक शिमगा खेळण्यासाठी येणाऱ्या गड्यांना जेवणाकरिता घरी न नेता आंदोलनाच्या ठिकाणी जेवण देण्याचा निर्णय मीराबागच्या गावकऱ्यांनी घेतला आहे. गाव वाचविण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागला असल्याचे गावातील ज्येष्ठ व जाणकार लोकांनी सांगितले. बंधारा प्रकरणामुळे मीराबाग येथील कित्येक लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
याला कारण स्थानिक राजकारणी असून लोकांना विश्वासात न घेता विश्वासघात करण्यात आला आहे. पण हा विश्वासघात कोणालाच सहजासहजी सोडणार नाही. कारण यात लोकांच्या भावना दुखावल्या आहेत व विश्वासाला तडा गेला आहे. गावातील लोकांची त्यांनी अशी परिस्थिती करुन ठेवली आहे व स्वत: मनमोकळेपणाने आनंद घेत आहेत. हे सर्व देव पाहत आहे हे कदाचित ते राजकारणी विसरले असतील. पण देव विसरणार नाही याची खात्री आम्हाला आहे, असे उद्गार ज्येष्ठ नागरिक आपा नाईक यांनी काढले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, गेले 20 दिवस झाले मीराबाग येथे विविध भागांतील लोकांचे आंदोलन सुरु आहे. पण स्थानिक लोकप्रतिनिधी व राजकारण्यांना तसेच राज्य सरकारला पडून गेलेले नाही हे उघड झाले आहे. येथे आंदोलन करणाऱ्यांचे या सरकारकडे किंवा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सभापती गणेश गावकर, मंत्री सुभाष फळदेसाई तसेच आमदार नीलेश काब्राल यांच्याकडे कोणतेच वैर नाही. पण जेव्हा सरकार सामान्य जनतेवर अन्याय करते आणि त्यांना हालअपेष्टा भोगायला लावते त्याचवेळी आंदोलनाची वाट पकडावी लागते व टीका करण्यास प्रवृत्त व्हावे लागते, असे मत नाईक यांनी व्यक्त केले.
खंडित होऊ दिली नाही परंपरा
मीराबाग गावात शिमगा खेळण्यासाठी येणाऱ्या शिमग्याच्या गड्यांना आम्ही आमच्या घरी संपूर्ण मानाने पूजा करुन जेवण वाढत होतो. ती प्रथा यंदा बंधाऱ्याच्या वादात खंडित झालेली आहे. तरी त्या गड्यांना उपाशीपोटी जाऊ न देता येथेच आंदोलनस्थळी त्यांच्या जेवणाची सोय करण्यात आली आहे. पूर्वजांनी सुरू केलेली परंपरा खंडित होऊ नये म्हणून महिलांनी सकाळपासून काम केले आहे व सर्वांसाठी जेवण तयार केले आहे, अशी माहिती नाईक यांनी दिली. राज्यात सर्वत्र हाहाकार माजलेला आहे. त्याकडे वेळीच लक्ष न दिल्यास ही परिस्थिती सर्व काही गिळंकृत करुन टाकेल, असे ते म्हणाले.
आझाद मैदानावर आंदोलनाची तयारी : उषा नाईक
गेले 20 दिवस सरकार का बहिरे आणि मुके झाले आहे ते समजत नाही. निवडणुका असतात तेव्हा मतदारांना भेटण्याच्या बाबतीत सत्ताधाऱ्यांना कोणत्याच अडचणी येत नाहीत. फक्त त्यांनी केलेली दुष्कर्मे उघड करण्यास सुऊवात केली की, त्यांना मतदार म्हणजे कचरा वाटतो, अशी टीका आंदोलक उषा नाईक यांनी केली. शिमग्याच्या दिवसांत ज्या राजकारण्यांनी सामान्य लोकांवर ही परिस्थिती आणली आहे त्यांनी आताच विचार करावा व हा बंधारा ताबडतोब रद्द करण्याबद्दल पावले उचलावीत. अन्यथा हे आंदोलन आझाद मैदानावर नेण्याच्या तयारीत आम्ही आहोत, असा इशारा त्यांनी दिला. भाजप सरकार जातीभेद करुन जे राजकारण करत आहे त्याला सर्वांनी एकत्र येऊन या देशातून हाकलून दिले पाहिजे. अन्यथा या जातीभेद करणाऱ्यांमुळे आम्ही एकमेकांचा नाश करणार, असे उद्गार आंदोलक संकेत भंडारी यांनी काढले.