मीराबाग आंदोलक आज पणजीत
इतर आंदोलकांनी पाठिंबा देण्याचे आवाहन
कुडचडे : मीराबाग-सावर्डे येथील प्रस्तावित बंधाऱ्याच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला काल रविवारी 48 दिवस पूर्ण झाले. या आंदोलनाचा आजचा 49 वा दिवस अत्यंत निर्णायक ठरणार असून आज सोमवारी आंदोलक आपली कैफियत मांडण्यासाठी पणजी येथील आझाद मैदानाला धडक देणार आहेत. या आंदोलनाला संपूर्ण राज्यातून पाठिंबा मिळत असून समर्थकांनी कंबर कसली आहे. आंदोलनाला समर्थन देणारे प्रजल साखरदांडे यांनी सरकारच्या भूमिकेवर कडक शब्दांत टीका केली आहे.
ते म्हणाले की, सरकार लोकांच्या इच्छेविऊद्ध प्रकल्प लादण्याचा प्रयत्न करत आहे. मुख्यमंत्र्यांनी तोंडी आश्वासन दिले असले, तरी जोपर्यंत जलस्रोत विभाग किंवा मुख्यमंत्र्यांकडून लेखी पत्र मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवावे. त्यांनी गोव्यातील इतर आंदोलकांना, विशेषत: चिंबलवासियांना आझाद मैदानावर येऊन मीराबागवासियांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. या आंदोलनात महिलांचा सहभाग मोठा असून त्यांच्या जिद्दीमुळे हे आंदोलन नक्कीच यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कोणी तरी बांधलेय मुख्यमंत्र्यांचे हात : प्रभुदेसाई
मुख्यमंत्री आणि जलस्रोतमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी बंधारा रद्द केल्याचे पत्र देण्यास असमर्थता दर्शवली. यावरून हे स्पष्ट होते की, मुख्यमंत्र्यांचे हात कोणा तरी अज्ञात शक्तीने बांधले आहेत, असा दावा अभिजित प्रभुदेसाई यांनी केला. आम्ही आझाद मैदानावर केवळ गाव वाचवायला जात नाही आहोत, तर सरकारला या अदृश्य शक्तीच्या दबावातून मुक्त करण्यासाठी जात आहोत. जर मुख्यमंत्री पत्र देऊ शकत नसतील, तर त्यांनी त्या पडद्यामागच्या व्यक्तीचा पत्ता द्यावा. आंदोलक थेट त्यांच्याशीच संवाद साधतील, असे प्रभुदेसाई पुढे म्हणाले.
पाण्याचा व्यवसाय करण्याचे कारस्थान : भंडारी
आंदोलक संकेत भंडारी यांनी सरकारने दिशाभूल केल्याचा आरोप केला. राज्यात पाण्याची कमतरता असल्याचे सांगणारे सरकार मोठमोठ्या इमारतींच्या बांधकामांना परवानगी कसे देते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हा केवळ पाण्याचा व्यवसाय करण्याचा कट आहे. हे पाणी कोणासाठी साठवले जाणार आहे, याचे उत्तर सरकारकडे नाही. जर लवकर बंधारा रद्द केल्याचा आदेश काढला नाही, तर हे ओझे सरकारला भारी पडेल, असा इशारा त्यांनी दिला. आंदोलक आपा नाईक यांनी बैठकीतील अनुभवाचा पाढा वाचला. सरकारमधील मंत्र्यांमध्ये ताळमेळ नसल्याचे दिसून येते. हे सरकार एखाद्या अक्कल नसलेल्या लहान मुलासारखे वागत असून त्यांना एक प्रकारचा आजार जडला आहे. त्यांना या मानसिकतेतून मुक्त करण्यासाठी आम्ही सोमवारी आझाद मैदानावर जाणार आहोत, असे त्यांनी नमूद केले.