मी इथे असेपर्यंत कोणावरही अन्याय होणार नाही' : अजित पवारांचे अल्पसंख्यांक समाजाला आवाहन
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काही पक्ष अल्पसंख्याक समाजावर राजकारण करत असल्याचा आरोप करत सरकारमध्ये असताना कोणावरही अन्याय होणार नसल्याची ग्वाही देताना हा आपला शब्द असल्याचं म्हटले आहे. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य पाळले जात असून अल्पसंख्याकांना घाबरून जाण्याचे कारण नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
नवी मुंबई वाशी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्यांक सेलच्या कार्यकर्त्यांचा मेऴावा पार पडला. या मेळाव्याला राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली होती. स्वता अजित पवारही या मेळाव्याला उपस्थित होते. या कार्यक्रमाला संबोधित करताना अजित पवार म्हणाले की, "साताऱ्यात जेव्हा अशा प्रकारची घटना घडली. त्यामध्ये एका मुस्लिम व्यक्तीचा मृत्यू झाला. मी त्या पीडितेच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबाची भेट घेतली. जोपर्यंत मी इथे आहे, तोपर्यंत तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. आम्ही सर्वजण कायद्याचे पालन करू," असे ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, "मला अल्पसंख्यांक समाजाला हे सांगायचे आहे की, महाराष्ट्रात यापुढेही कायद्याचे राज्य राहील. आणि महाराष्ट्रात कोणावरही अन्याय होणार नाही. सगळ्य़ांना माहित आहे की मी माझ्या शब्दाला पक्का असणारा माणूस आहे."
दरम्यान, या कार्यक्रमात एकूण नऊ ठराव पारित करण्यात आले. यामध्ये जात सर्वेक्षण करून मुस्लिमांना राजकीय, नोकरी आणि शैक्षणिक आरक्षण देण्याचाही एक ठराव यामध्ये होता पण या मेळाव्यानंतर राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे नजीब मुल्ला यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले 'राजकीय आरक्षण' हा शब्द चुकीचा एसून हा ठराव केवळ नोकरी आणि शिक्षणातील आरक्षणाबाबत होता.