अल्पवयीनवर अत्याचार ; आरोपीस तीन वर्षे कारावास
वडूज :
अल्पवयीन मुलीस मारहाण करून विनयभंग करणाऱ्या आरोपीस वडूज येथील अतिरिक जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन वर्षाचा कारावासाची शिक्षा सुनावली. दादा पांडुरंग खांडेकर (वय 40) रा. खांडेकर वस्ती (म्हसवड, ता. माण) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
दि. 04/09/2020 रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास म्हसवड ता. माण गावचे हद्दीत रोडला असलेले महादेव मळा येथे आरोपीने फिर्यादीचे शेतात वरील अपराध केला होता. त्या संदर्भात म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
या खटल्याची थोडक्यात हकीकत अशी, यातील फिर्यादी यांचे शेतात फिर्यादीच्या दोन अल्पवयीन मुली म्हशी चारण्याकरीता गेल्या असता आरोपी दादा खांडेकर याने फिर्यादीच्या दोन्ही अल्पवयीन मुलींचा पाठलाग करून त्यापैकी एक अल्पवयीन मुलगी तेथून पळून गेल्यावर दुसरी अल्पवयीन मुलगी पळत असताना खाली पडल्याने तिला दमदाटी करून छेडछाड केली. तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिला हाताने मारहाण केली. तसेच धक्काबुक्की केली म्हणून म्हसवड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुह्यात स.पो.नि. गणेश वाघमोडे व स.पो.नि. बाजीराव ढेकळे यांनी तपास केला. तसेच वैद्यकीय पुरावे जमा केले व कसून तपास करून आरोपीविरुद्ध जिल्हा सत्र न्यायालय, वडुज येथे दोषारोपपत्र दाखल केले. वडूज येथील अति. जिल्हा व सत्र न्यायालयात याकामी सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील आर. डी. खोत यांनी काम पाहिले. यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने 10 साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांचे जाब-जबाब, कागदोपत्री पुरावा, वैद्यकीय पुरावा व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. एस. कोले यांनी आरोपी दादा खांडेकर यास पोक्सो कलम 8 व भा.द.वि. स. कलम 323 अन्वये दोषी ठरवून पोक्सो कलम 8 अन्वये 3 वर्ष सश्रम कारावास व 1000 रुपये दंड आणि दंड न भरलेस 1 महिने साधी कैद व भा.द.वि. स. कलम 323 अन्वये 3 महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली.
सदर खटला चालवणे कामी उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे, स.पो.नि. अक्षय ए. सोनवणे म्हसवड पोलीस ठाणे यांनी मार्गदर्शन केले. तसेच प्रॉसिक्युशन स्क्वाड पो.उप. नि. दत्तात्रय जाधव, म.पो.हवा. विजयालक्ष्मी दडस, पो. कॉ. अमीर शिकलगार, पो. कॉ. सागर सजगणे, पो.कॉ. जयवंत शिंदे यांनी सहकार्य केले.